मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातील शिळे अन्न खाल्ल्याने दगावली शेळी; मैदानावर पत्रावळ्या अस्ताव्यस्त  

By संजय तिपाले | Published: January 11, 2024 07:09 PM2024-01-11T19:09:06+5:302024-01-11T19:09:21+5:30

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानामध्ये हजारो महिलांना एकत्रित आणले होते.

Goat dies after eating stale food at Chief Minister's event Awkward letters on the field | मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातील शिळे अन्न खाल्ल्याने दगावली शेळी; मैदानावर पत्रावळ्या अस्ताव्यस्त  

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातील शिळे अन्न खाल्ल्याने दगावली शेळी; मैदानावर पत्रावळ्या अस्ताव्यस्त  

गडचिरोली: शहरातील एमआयडीसीजवळील कोटगल रस्त्यालगतच्या मैदानावर ९ जानेवारीला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी महिलांना वाटप केलेले शिल्लक अन्न तसेच पत्रावळ्या उघड्यावर फेकण्यात आल्या. तेथे शिळा भात खाल्ल्याने एका शेतकऱ्याची शेळी दगावली असून, दुसरी शेळीही आजारी पडली आहे. कोटगल येथे ११ जानेवारी रोजी ही घटना समोर आली.

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानामध्ये हजारो महिलांना एकत्रित आणले होते. यावेळी जिल्हा प्रशासनाने ३८ हजार ५०० महिलांना विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली दिला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह खासदार, आमदार व स्थानिक नेते तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी महिलांना जेवण देण्यात आले. शिल्लक अन्न व पत्रावळ्या उघड्यावरच टाकल्या होत्या. 

या पत्रावळ्या कार्यक्रमस्थळी अस्ताव्यस्त पसरल्या आहेत. दरम्यान, १० जानेवारीला नित्याप्रमाणे कोटगल येथील श्रीकृष्ण कवडुजी भोयर यांच्या शेळ्या गुराख्याने चारण्यासाठी परिसरात नेल्या होत्या. सायंकाळी शेळ्यांचा कळप घराकडे परत असताना भोयर यांच्या दोन शेळ्यांनी पत्रावळीवरील भात खाल्ला, काही वेळाने दोन्ही शेळ्या फुगल्या. भोयर यांनी तात्काळ खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांना पाचारण केले; पण उपचारानंतर एक शेळी दगावली असून, दुसरी शेळीही अत्यवस्थ आहे. दोन्ही शेळ्यांची किंमत प्रत्येकी दहा हजार रुपये असून, कार्यक्रमस्थळावरील शिळा भात खाण्यात आल्यामुळेच शेळ्यांवर हे संकट ओढावल्याचा दावा भोयर यांनी लोकमतशी बोलताना केला. याबाबत तहसीलदार महेंद्र गणवीर यांना संपर्क केला असता त्यांनी कॉल घेतला नाही. दरम्यान, प्रशासनाने या घटनेची जबाबदारी घेऊन संबंधितास नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.

तहसील प्रशासनाचा हलगर्जीपणाने गालबोट
कोटगल परिसरातील कार्यक्रम गडचिरोली तहसील हद्दीत झाला होता. मात्र, तहसील प्रशासनाने शिळ्या अन्नासह पत्रावळ्यांची योग्य विल्हेवाट लावली नाही, त्यामुळे मुक्या प्राण्याचा बळी गेला. या परिसरात चारण्यासाठी गुरे नेली जातात, त्यामुळे खबरदारी आवश्यक होती; पण शेळीच्या मृत्यूने तहसील प्रशासनाची हलगर्जी चव्हाट्यावर आली आहे.

Web Title: Goat dies after eating stale food at Chief Minister's event Awkward letters on the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.