जिल्हावासीयांना उद्या देव पावणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2021 05:00 AM2021-10-06T05:00:00+5:302021-10-06T05:00:43+5:30
संकटकाळात मानसिक आधार ठरणारी सर्वच धार्मिक स्थळे, कार्यक्रम बंद असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह भक्तमंडळींना घरी बसूनच मनोमन आपली भक्ती पूर्ण करावी लागली. काही दिवसांपूर्वी भाजपने यासाठी आंदोलनही केले. पण, कोरोनाला रोखण्यासाठी जोखीम पत्करणे योग्य नसल्याचे सांगत शासनाने मंदिरे उघडण्यास परवानगी दिली नाही. आता राज्यभरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने देवालये उघडण्यास परवानगी देण्यात येत आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तब्बल दीड वर्षाच्या कोरोनाकाळात काही दिवसांचा अपवाद वगळता बंदच असलेली मंदिरे गुरुवार, ७ ऑक्टोबरपासून उघडली जाणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य शासनाने याबाबतचा निर्णय घेतला. दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात तो आदेश लागू करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय जाहीर केलेला नसला तरी बुधवारी हा निर्णय आणि त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे.
संकटकाळात मानसिक आधार ठरणारी सर्वच धार्मिक स्थळे, कार्यक्रम बंद असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह भक्तमंडळींना घरी बसूनच मनोमन आपली भक्ती पूर्ण करावी लागली. काही दिवसांपूर्वी भाजपने यासाठी आंदोलनही केले. पण, कोरोनाला रोखण्यासाठी जोखीम पत्करणे योग्य नसल्याचे सांगत शासनाने मंदिरे उघडण्यास परवानगी दिली नाही. आता राज्यभरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने देवालये उघडण्यास परवानगी देण्यात येत आहे.
मंदिरात जाण्यापूर्वी हे लक्षात ठेवा
कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी तो पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे भाविकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
शक्यतोवर कोरोना प्रतिबंधक दोन लस घेतलेल्या नागरिकांनाच मंदिरात प्रवेश दिला जाण्याची शक्यता आहे. ते नागरिकांच्या हिताचे राहील.
कोणत्याही परिस्थितीत मंदिरात गर्दी करणे टाळावे, एकमेकांपासून विशिष्ट अंतर ठेवूनच दर्शन घ्यावे. मास्कचा वापर आवर्जून करावा.
मार्कंडेश्वर देवस्थान समितीची तयारी
- जिल्ह्यातील सर्वाधिक भक्तांची गर्दी खेचणाऱ्या श्री मार्कंडेश्वर मंदिर कमिटीकडून दारे उघडण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र अद्याप त्याबाबत जिल्हाधिकारी आणि भारतीय पुरातत्त्व विभागाकडून आदेश आलेला नाही. तो मिळाल्यानंतर मंदिर ७ ऑक्टोबरपासून उघडले जाणार आहे.
- मंदिरात दर्शनासाठी येताना कोरोनाचे सर्व नियम पाळावेत. भाविकांनी मास्क, सॅनिटायझर, शारीरिक अंतर ठेवणे बंधनकारक राहणार आहे, असे देवस्थान समितीचे अध्यक्ष गजानन भांडेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
दीड वर्षानंतर देव घेणार मोकळा श्वास
ईश्वरासाठी त्याचे भक्तच सर्वाधिक प्रिय असतात, असे म्हणतात. पण, जवळपास दीड वर्ष भक्त आणि ईश्वरात कोरोनाने दुरावा निर्माण केला होता. तो दुरावा आता दूर होत असल्यामुळे भक्तांसोबत देवालाही दिलासा मिळणार आहे. अनेक दिवस मंदिरात बंदिवासात असलेले देव आता मोकळा श्वास घेतील.