गोदावरी सिरोंचासाठी ठरली नुकसानीचीच

By admin | Published: May 12, 2016 01:34 AM2016-05-12T01:34:42+5:302016-05-12T01:34:42+5:30

सिरोंचा तालुक्यात प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती या बारमाही वाहणाऱ्या नद्या असून या नद्यांचा सिंचनासाठी काहीही उपयोग झाला नाही.

Godavari syaronachicha damichiichiichiichi | गोदावरी सिरोंचासाठी ठरली नुकसानीचीच

गोदावरी सिरोंचासाठी ठरली नुकसानीचीच

Next

गोदावरीने गडपली जमीनही : मेडिगड्डा-कालेश्वर प्रकल्पालगतचाच भाग बाधित
आनंद मांडवे सिरोंचा
सिरोंचा तालुक्यात प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती या बारमाही वाहणाऱ्या नद्या असून या नद्यांचा सिंचनासाठी काहीही उपयोग झाला नाही. उलट प्रत्येक पावसाळ्यात पुरामुळे कोट्यवधींच्या खरीप व रबी पिकांचे नुकसान झाले. शिवाय महापुराच्या तडाख्याने शेकडो हेक्टर सुपीक जमीन गोदावरीत गडप झाली.

शेतकऱ्यांच्या सातबारावर नोंद असलेली जमीन प्रत्यक्षात मोक्यावर नाही. १९५८ मध्ये गोदावरी, प्राणहिताला प्रचंड पूर येऊन हजारो नागरिक विस्थापित झाले. तत्कालीन ब्रिटिश सरकारने १८४६ मध्ये वसविलेल्या सिरोंचा, रयतवारी क्षेत्राचे नजीकच्या क्षेत्रात पुनर्वसन करण्यात आले. त्यासाठी झुडुपी जंगल कटाई करून आपदग्रस्तांना निवासी प्रयोजनार्थ भूखंडाचे वाटप करण्यात आले. सिरोंचा नगराचा भाग असलेले हे गाव सिरोंचा मालगुजारी (कोत्तागुडम) म्हणून सध्या अस्तित्वात आहे. १९८६ व १९८९ च्या महापुरानेही फार नुकसान झाले. यावेळी मद्दिकुंटा, आरडा, लंबडपल्ली, पेंटिपाका, तुमनुरसह अंकिसा-आसरअल्ली गावातील अनेकांचे पुनर्वसन झाले. १९९५ च्या महापुराने तालुक्यातील १४८ गावांपैकी १०३ गावे प्रभावित होऊन शेकडो हेक्टर पिकांचे नुकसान झाले. आॅक्टोबर २००८ मध्ये विद्युत पुरवठा व सिंचनाअभावी कापूस पीक धोक्यात आले. कधी अवर्षणाने तर कधी अनियमित विद्युत पुरवठ्याने पीक धोक्यात आले असतांना तालुक्यातील बंधाऱ्यांनीही साथ दिली नाही.
१९९५ मध्ये राजस्व निरीक्षण मंडळ सिरोंचा अंतर्गत १८९४ शेतकऱ्यांच्या १६७.७६ हेक्टर खरीप तर १६८६ हेक्टर रबी पिकांचे नुकसान झाले. आसरअल्ली सर्कलमधील ५३ गावातील २६८.०२ हेक्टर खरीप व २८७६ हेक्टर रबी पीक वाया गेले. २००८ व २००९ मध्येही पुराने शेतीचे नुकसान झाले. २०१० मध्ये संततधार पाऊस होऊन पुराने १४८ गावांपैकी ६८ गावांतील २ हजार ५६ हेक्टरमधील ५० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रातील पिके उद्ध्वस्त झाली. यात २२४० शेतकऱ्यांचे १ कोटी ४३ लाख ९४ हजार ८०० रूपयांचे नुकसान झाले. यातील सर्वाधिक बाधित क्षेत्र कापसाचे व आराजी १२१४ हेक्टर होती. त्या खालोखाल ७८७ हेक्टर धान पीक तर ५५ हेक्टर सोयाबिन पिकाला फटका बसला. यासह बामणी, टेकडाताला, पेंटीपाका येथीलही पिकांचे नुकसान झाले. पेंटीपाका मंडळातील १५१ शेतकऱ्यांचे नुकसान १४ लक्ष २१ हजारांचे झाले. आजतागायत आसरअल्ली सर्कलमधील ५८० हेक्टर ७५ आर शेतजमीन गोदावरीच्या पुराने खरडून गेली. यात आसरअल्लीची १८३.५० हेक्टर, अंकिसा माल १०५.८७ हेक्टर, अंकिसा चक येथील ६२.५०, सुंकरअल्लीची ९०, टेकडामोटला येथील ६६.७८ व मुत्तापूर माल येथील ७१ हेक्टर जमिनीचा समावेश आहे. तत्कालीन जमिनदार व्यंकट मुरली मनोहर राव यांची आजतागायत तीन हजार एकर जमीन गोदावरीत गडप झाली, असे जाणकार सांगतात.
या पार्श्वभूमीवर तालुका मुख्यालयालगतची धर्मपुरी उपसा सिंचन योजना ३० वर्षांपासून प्रलंबित असून रेगुंठा उपसा सिंचनही पूर्णत्वास आले नाही. ग्रामीण भागातील छोटे कास्तकार कर्जबाजारी झाले. बहुसंख्य ग्रामीण आदिवासींना उदरनिर्वाहासाठी स्थानांतरण करावे लागले. अशा विपरीत परिस्थितीत १९९१ मध्ये पेद्दी शंकरन्नाच्या रूपात येथे तत्कालीन पीपल्स वॉर ग्रुप या नक्षल संघटनेला आयते मैदान मिळाले. कालांतराने येथे नक्षलवाद वाढीस लागला. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर तेंदूपत्ता ठेकेदारांकडून लूट होऊ लागली. सिंचनाअभावी शेतजमीन पडीत ठेवणारा मोठा शेतकरीवर्ग येथे तयार झाला. कोर्ला, रमेशगुडम भागातील शेतकऱ्यांची जमीन इंद्रावतीच्या काठावर आहे. परंतु सिंचनाची सोय नाही. शेतकऱ्यांनी तेलंगणाच्या करिमनगर, वरंगल येथून बियाणे आणून भुईमूग व कापसाची शेती निसर्गाच्या भरवशावर सुरू केली आहे.

Web Title: Godavari syaronachicha damichiichiichiichi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.