गोदावरी तिरावर टाकणार भराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 10:15 PM2019-07-08T22:15:45+5:302019-07-08T22:16:27+5:30
तेलंगणा सरकारच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या कालेश्वरम सिंचन प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील आईपेठा व तुमनूर ही गावे बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे. सदर गावे बुडीत क्षेत्रात येऊ नये, यासाठी तेलंगणा सरकार गोदावरी तिरावर मातीचा भराव टाकणार आहे. यासाठी राज्य शासनाने १० हेक्टर वनजमीन वळती केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तेलंगणा सरकारच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या कालेश्वरम सिंचन प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील आईपेठा व तुमनूर ही गावे बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे. सदर गावे बुडीत क्षेत्रात येऊ नये, यासाठी तेलंगणा सरकार गोदावरी तिरावर मातीचा भराव टाकणार आहे. यासाठी राज्य शासनाने १० हेक्टर वनजमीन वळती केली आहे.
गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारच्या वतीने कालेश्वरम धरण बांधले जात आहे. या धरणाचे संपूर्ण पाणी तेलंगणासाठी वापरले जाणार आहे. सदर पाणी कालव्याने हैदराबादपर्यंत नेले जाणार आहे. सिरोंचा तालुक्यातील गावांना पाणी मिळणार नाही. मात्र काही गावे बुडणार आहेत. सुरूवातीला गावकऱ्यांनी विरोध केला. महाराष्टÑ राज्य शासनाकडे मागणी केली. मात्र राज्य शासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता सिरोंचा तालुक्यातील काही गावे बुडीत क्षेत्रात येणार आहेत.
आईपेठा व तुमनूर ही गावे बुडीत क्षेत्रात जाऊ नये, यासाठी गोदावरी नदीच्या डाव्या सिमेंट काँक्रिट व मातीचा तिरावर भराव टाकला जाणार आहे. या ठिकाणी जंगल असल्याने सदर जमीन वनविभागाच्या अखत्यारित आहे. ज्या ठिकाणी भराव टाकायचा आहे, त्यासाठी १०.२३ हेक्टर वनजमीन वळती केली जाणार आहे.
भराव टाकताना पर्यावरण संवर्धन कायद्याच्या सर्व अटी तेलंगणा सरकारने पाळाव्यात, असे निर्देश दिले आहेत. याबाबत राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाने ६ जुलै रोजी शासन निर्णय काढला आहे. भराव टाकण्यामुळे ही दोन्ही गावे बुडीत क्षेत्रात येणार नाही. मात्र सिंचनाचा लाभही मिळणार नाही.
जमीन महाराष्ट्राची, पाणी मात्र तेलंगणाला
गोदावरी नदी महाराष्ट्र व तेलंगणा राज्याची दुभाजक आहे. त्यामुळे या नदीच्या पाण्यावर दोन्ही राज्यांचा सारखा हक्क आहे. तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर प्रकल्प उभा केला. या ठिकाणचे पाणी ३०० किमी अंतरावर असलेल्या हैदराबाद येथे पोहोचविले जाणार आहे. गोदावरी नदीच्या पाण्यावर दोन्ही राज्यांचा सारखा हक्क आहे. प्रकल्पासाठी सिरोंचा तालुक्यातील शेकडो हेक्टर जमीन बुडीत क्षेत्रात जात आहे. मात्र पाण्याचा लाभ तेलंगणा राज्याला होणार आहे. महाराष्ट्र शासनाने कोणतेही पाऊल उचलले नसल्याने राज्याला लाभ मिळाला नाही.