पोलीस अधीक्षक कार्यालयात खरेदी प्रक्रियेत गौडबंगाल
By Admin | Published: August 2, 2015 01:32 AM2015-08-02T01:32:27+5:302015-08-02T01:32:27+5:30
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयात २०१० पासून साहित्य खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली, ...
वरिष्ठ पोलीस अधिकारीही सहभागी : एकाच व्यक्तीकडून विविध फर्मच्या नावाने खरेदी
गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयात २०१० पासून साहित्य खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली, असल्याची माहिती आता पुढे येऊ लागली आहे. अलिकडेच दोन कंत्राटदारांवर बोगस देयके सादर केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यामुळे मागील पाच वर्षांपासूनचा साहित्य खरेदी प्रक्रियेतलाही गोंधळ आता उजेडात आला आहे.
सन २०१० ते २०१४ या कालावधीत पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्या कार्यालयामार्फत रजिस्टर शाखेत दैनंदिन व इतर साहित्य खरेदी करण्यात आले. सदर खरेदी २०१० च्या पूर्वीपासून एकाच व्यक्तीकडून विविध फर्मच्या नावाने करोडो रूपयांची करण्यात आली, अशी माहिती पुढे आली आहे. स्थानिक बाजारात या नावाचे कोणतेही फर्म अस्तित्वात नाही. मात्र पोलीस अधीक्षक कार्यालयाला नियमित साहित्य पुरवठा यांच्या मार्फत होत असल्याचे दिसून येत आहे. अशा फर्मच्या नावे बिलसुध्दा काढण्यात आले आहे. चार ते पाच करोड रूपयांची खरेदी यांच्याकडूनच करण्यात आली आहे. त्याचा व्हॅट व इतर प्रकारची नोंदणी करण्यात आली नाही. शासनास करही अदा करण्यात आला नाही. स्थानिक बाजारपेठेत कोणतीही वस्तू या फर्ममार्फत विकली जात नाही. मात्र पोलीस अधीक्षक कार्यालयाला साहित्य पुरवठ्याचे काम नियमितपणे सुरू आहे. वित्तीय अधिकार नियम १९०९५ नुसार कार्यालयाच्या प्रमुखास एकाच दिवशी एक वस्तू एक हजार रूपयांपर्यंत खरेदी करण्याचे अधिकार असताना विविध वस्तुंची १० हजार रूपयांपर्यंत खरेदी करून शासकीय रक्कमेची मोठ्या प्रमाणावर अफरातफर झाल्याचेही दिसून येत आहे. या प्रक्रियेत पोलीस अधीक्षक कार्यालयातील काही अधिकारी, कर्मचारी व वरिष्ठ अधिकारीही सहभागी असल्याची शक्यता नाकारता येत नाही. वाढीव बिल काढण्यासाठी बोगस कामही दाखविण्यात आले, अशी चर्चा सध्या पसरली आहे. एसआरई हा राखीव सुरक्षा फंड आहे. या फंडातूनही कंत्राटदारांवर निधी खर्च करण्यात आला. इलेक्ट्रीक साहित्य नागपूरच्या व्यापाऱ्याकडून स्थानिक बोगस फर्मच्या नावावर साहित्याची खरेदी पोलीस विभागाने केली, अशी माहितीही आता पुढे आली आहे.
बनावट देयके सादर करून रक्कम हडपण्याचे प्रकरण उजेडात आल्यानंतर आपण सदर प्रकरण तपासात घेतला. या प्रकरणी दोन कंत्राटदारांना अटक करून त्याची रवानगी पोलीस कोठडीत झाली आहे. बोगस देयके सादर करणाऱ्या पाच कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. कार्यालयाला बनावट देयक व साहित्य पुरवठा गैरप्रकाराबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे. या प्रकरणात दोषी आढळून आलेल्यांवर निश्चित कारवाई होईल.
- संदीप पाटील,
जिल्हा पोलीस अधीक्षक