वैनगंगा नदीत पोहायला जाणे जीवावर बेतले, विद्यार्थी प्रवाहात वाहून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2021 03:27 PM2021-10-21T15:27:05+5:302021-10-21T15:45:33+5:30
सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास तो ट्युशनला जातो, असे सांगून इतर चार वर्गमित्रांसोबत वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटावर पोहायला गेला.
गडचिरोली : ट्युशनला जातो असे सांगून वर्गमित्रांसोबत नदीवर पोहायला जाणे एका दहावीतील विद्यार्थ्याच्या जीवावर बेतले. अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडून वाहून गेला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. गुरुवारी दुपारपर्यंत त्याचा शोध सुरुच होता.
प्रियदत्त उर्फ प्रियांशू माझोके असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो येथील प्लॅटिनम ज्युबिली स्कूल व ज्यु.कॉलेजचा विद्यार्थी होता. बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास तो ट्युशनला जातो, असे सांगून इतर चार वर्गमित्रांसोबत वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटावर पोहायला गेला.
पोहता पोहता तो खोल पाण्याकडे गेला. त्या ठिकाणी असलेल्या मच्छीमारांनी तिकडे जाऊ नका, खोल पाणी आहे असे बजावले होते. पण त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. प्रियांशू पाण्यातून बाहेर आला नसल्याचे पाहून इतर चारही मित्र घाबरले. त्यांनी ही माहिती घरच्या लोकांना दिली. गुरुवारी दुपारपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता.