गटसाधन केंद्र पुस्तकांनी भरले तालुक्याला
By admin | Published: May 23, 2014 11:53 PM2014-05-23T23:53:06+5:302014-05-23T23:53:06+5:30
राज्याच्या शालेय शिक्षण विभागामार्फत शिक्षणाच्या अधिकार अधिनियमानुसार इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात.
पुस्तक पोहोचली : मुख्याध्यापक, शिक्षकांची लगबग सुरू
गडचिरोली : राज्याच्या शालेय शिक्षण विभागामार्फत शिक्षणाच्या अधिकार अधिनियमानुसार इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात. जि.प. च्या शिक्षण विभागाने योग्य नियोजन केल्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसात बाराही तालुक्याच्या ठिकाणी पाठ्यपुस्तके पोहोचली आहे. ही पाठ्यपुस्तके शाळांवर नेण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांची लगबग सुरू झाली आहे. दरवर्षी जिल्ह्यातील अहेरी, भामरागड, सिरोंचा, कोरची या दुर्गम तालुक्यात वेळेवर पाठ्यपुस्तके पोहोचत नव्हती. मात्र यावर्षी योग्य नियोजन करण्यात आल्यामुळे सर्वप्रथम या चार दुर्गम तालुक्याच्या ठिकाणी पाठ्यपुस्तके पोहोचविण्यात आली आहेत. त्यानंतर दुसर्या टप्प्यात चार तालुके व तिसर्या टप्प्यात उर्वरित चार तालुके अशा बाराही तालुक्यात पाठ्यपुस्तके पोहोचली आहेत. गडचिरोली येथील गटसाधन केंद्रात इयत्ता पहिली ते आठवीच्या अभ्यासक्रमाचे मराठी, हिंदी, सेमी इंग्लीश व इंग्लीश या चार माध्यमांची पाठ्यपुस्तके पोहोचली आहे. १३ लाख ५ हजार १९७ पाठ्यपुस्तके ठेवण्यात आल्याने गटसाधन केंद्र पुस्तकांनी गच्च भरले आहे. गडचिरोली पंचायत समितीमधील मुरखळा, काटली, येवली या तीन केंद्रातील शाळांवर पाठ्यपुस्तके पोहोचविण्याची कार्यवाही सुरू असल्याचे गटसाधन केंद्राच्या समन्वयकांनी सांगितले आहे. तालुक्यातील शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षक गटसाधन केंद्रात येऊन वाहनाने आपल्या शाळेत पुस्तके नेत आहेत. २ ते ३ दिवसात ताुलक्यातील ९ केंद्रातील सर्व शाळांवर पुस्तके पोहोचणार आहेत. आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, अहेरी आदीसह १२ तालुक्याच्या ठिकाणी पुस्तके पोहोचली आहे. सदर पुस्तके २ हजार ४८ शाळांमधील एकूण १ लाख ३६ हजार ४८२ विद्यार्थ्यांच्या हातात पडणार आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)