देसाईगंजात सोन्याचा भाव ५० हजारांवर
By admin | Published: November 11, 2016 01:20 AM2016-11-11T01:20:06+5:302016-11-11T01:20:06+5:30
५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय ८ नोव्हेंबर रोजी केंद्र शासनाने घेतल्यानंतर देसाईगंज शहरातील काळा पैसाधारकांचे धाबे दणाणले आहेत.
५०० व १००० च्या नोटा बंद झाल्याचा परिणाम : काळा पैसावाल्यांची दुकानात गर्दी वाढली
देसाईगंज : ५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय ८ नोव्हेंबर रोजी केंद्र शासनाने घेतल्यानंतर देसाईगंज शहरातील काळा पैसाधारकांचे धाबे दणाणले आहेत. या पैशाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने त्यांचा मोर्चा आता सोन्याच्या दुकानांकडे वळला आहे. याच संधीचा फायदा उचलत सराफा व्यापाऱ्यांनीही सोन्याचे भाव गगणाला भिडविले आहेत. बुधवारपासून देसाईगंज शहरातील काही सोने चांदीचे दुकानदार या काळ्या पैसेवाल्यांना तब्बल ५० हजार रूपये तोळ्याने सोन्याची विक्री करीत आहेत.
देसाईगंज हे गडचिरोली जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असलेले व काही प्रमाणात औद्योगीकरण झालेले शहर आहे. या शहरात लहान, मोठे शेकडो व्यापारी आहेत. देसाईगंज येथील कपडा, बाजार संपूर्ण जिल्ह्यात प्रसिध्द आहे. त्याचबरोबर इतरही वस्तू ठोक भावाने स्वस्त मिळत असल्याने जिल्ह्यातील अनेक ग्राहक देसाईगंज येथूनच माल खरेदीस पसंती दर्शवितात. देसाईगंज शहरात विविध मालाचे शेकडो ठोक विक्रेते आहेत. सदर व्यापाऱ्यांनी शासनाचा कर चुकवित कोट्यवधी रूपयांचा काळा पैसा जमा करून ठेवला आहे. मात्र पंतप्रधानांनी ५०० व १००० रूपयांच्या नोटा बंद केल्यानंतर काळा पैसा बाळगणारे व्यापारी अडचणीत आले आहेत. काळा पैसा बाळगणाऱ्यांनी आपला मोर्चा सोना, चांदीच्या दुकानाकडे वळविल्यानंतर सोने, चांदी दुकानदारांनी १० ग्रॅम सोन्याची किमत ५० हजार रूपये आकारण्यास सुरूवात केली.
या ५० हजार रूपयांच्या भावाने देसाईगंज शहरात एकाच दिवसात तीन किलो सोना विकला असल्याची चर्चा आहे. काळ्या पैशाला नियमित करण्यासाठी व्यापाऱ्यांनी विविध शक्कल लढविण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच हा एक भाग आहे. ५० हजार रूपये दराने सोने खरेदी करताना मात्र खरेदीचा बिल मागील तारखेचा देण्याची अट व्यापाऱ्यांनी घातली आहे. जुन्या तारखेचा बिल देण्यास सोने, चांदी व्यावसायिक तयारही झाले आहेत. त्यामुळे काळ्या पैशाला पांढरा करण्यात सोने, चांदी व्यावसायिकांचाही हात आहे. आयकर विभागाने सोने, चांदी व्यापाऱ्यांवरही कडक नजर ठेवण्याची मागणी केली जात आहे. (वार्ताहर)