गडचिरोली जिल्ह्यातल्या जंगलातून सोनपाखरू होताहेत दुर्मिळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 12:18 PM2020-07-23T12:18:21+5:302020-07-23T12:18:44+5:30
जंगलातील हिवर, किन्ह, मोवई, बोर आदी प्रजातींच्या झाडांची पाने सोनपाखरू खातात. त्यामुळे याच झाडांवर विशेषत: त्यांचे वास्तव्य असते. मात्र दिवसेंदिवस सोनपाखरू दुर्मीळ होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पावसाळ्यात जंगलातील विशिष्ट झाडांवर लालसर, गर्द निळ्या रंगाचे कीटक आढळतात. या कीटकांना झाडीपट्टीत सोनपाखरू म्हटले जाते. या सोनपाखराचे बालकांमध्ये विशेष आकर्षण असते. आकर्षक रंगामुळे हे कीटक बालके सहजरित्या हाताळतात. मात्र दिवसेंदिवस सोनपाखरू दुर्मीळ होत आहे.
जंगलातील हिवर, किन्ह, मोवई, बोर आदी प्रजातींच्या झाडांची पाने सोनपाखरू खातात. त्यामुळे याच झाडांवर विशेषत: त्यांचे वास्तव्य असते. झाडाची पाने खाताना घिरट्या घालून ते लक्ष वेधतात. सोनपाखरू कीटक प्रजातीचे आहे. शास्त्रीय भाषेत त्याला इंडियन ज्वेल बिटल असे नाव आहे. झाडीपट्टीत या कीटकाला सोनपाखरू नावाने ओळखले जाते. आकर्षक रंगामुळे बालके सोनपाखरू हे कीटक आहे हे सुद्धा विसरतात. मात्र हे कीटक दिवसेंदिवस दुर्मीळ होत चालले आहे.
हिरवीगार मऊ पाने खाद्य
पहिल्या पावसानंतर ग्रामीण भागात बालके हिवर, मोवई, बोरी, किन्ह आदी प्रजातींच्या झाडावर सोनपाखरे शोधतात. याच झाडांची मऊ पाने सोनपाखरांचे खाद्य आहे. विशेषत: अनेकजण गुराख्यांना सोनपाखरू आणायला सांगतात. घरी सोनपाखरू आल्यानंतर चिमटा घालणाऱ्या त्याच्या तीक्ष्ण मानेत धागा बांधून आगपेटीत बालके कोंडून ठेवतात. मात्र याच कालावधीत सोनपाखरे अंडी घालतात. आता हा प्रसंग क्वचितच घडतो.