चोप येथे गोंड-गोवारी समाजाकडून यावर्षीही गायगोधन व ढालपूजन; ४५० वर्षांचा सांस्कृतिक वारसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2022 01:15 PM2022-10-28T13:15:05+5:302022-10-28T13:23:58+5:30
जुनी परंपरा असलेला आदिवासी गोंडगोवारी जमातीचा हा गायगोधन व ढालपूजन उत्सव आजही सुरू आहे.
कोरेगाव (गडचिरोली) : चोप येथे ४५० वर्षांचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेली गायगोधन व ढालपूजनाची परंपरा यावर्षीही जपत गोंड-गोवारी समाजाने मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला. गायी राखणे हा गोंडगोवारी जमातीचा पारंपरिक व्यवसाय असल्याने लोक गायीची भक्तिभावाने पूजा करतात. नंतर ढालपूजनास सुरुवात होते.
ढालीला सजवून सुताराच्या घरचे पाणी पाजल्या जाते. ढाल गायगोधनावर येते. प्रथम ती खिल्या मुठवा देवाची भेट घेते, परी कुपार लिंगो व माता रायगड जँगो यांचे प्रतीक दोनमुखी ढाल आणि चारमुखी ढाल यांचे पूजन होते. गोंडगोवारी जमातीचे लोक डफली, माळू, साखळी यांच्या साहाय्याने नाच करतात. यानंतर ढालीची गावभर मिरवणूक काढली जाते. रात्री सामूहिक भोजन केल्या जाते, ढालपूजनाचा हा कार्यक्रम डार जागरण ते ढालपूजनापर्यंत ३ दिवस चालतो.
या कार्यक्रमाला आदिवासी गोंड-गोवारी संस्कृती व कल्याण मंडळाचे जिल्हा सचिव धनराज दूधकुंवर, वडसा तालुका अध्यक्ष नानाजी दुधकुंवर, चोपचे अध्यक्ष चंद्रहास ठाकरे, शेंड्या शिवाजी नेवारे, मोरेश्वर दुधकुंवर, ओम नेवारे, धनिराम दुधकुंवर, रवींद्र काळसरपे, विजय राऊत, विवेक नेवारे, माधोजी सहारे, रमाकांत नेवारे, बंडूजी नेवारे, गणेश नेवारे, मुखरू चचाने, चोपचे सरपंच नितीन लाडे, हेमलता दुधकुंवर, चंद्रकला नेवारे, शालू चचाणे, सुरेखा दुधकुंवर, राधाबाई काळसरपे, गावातील गोंड, परधान आणि इतर समाजाच्या नागरिकांनी सहकार्य केले.
जुनी परंपरा असलेला आदिवासी गोंडगोवारी जमातीचा हा गायगोधन व ढालपूजन उत्सव आजही सुरू आहे. विदर्भातील अनेक गावांमध्ये हा उत्सव तीन दिवस साजरा केला जातो.
कोंबडीचे पिल्लू व अंडे सुरक्षित राहावे
आखरावर ३० ते ४० टोपले शेणाचा ढीग करून त्यात जिवंत कोंबडीचे पिल्लू आणि अंडे ठेवले जाते. शेंड्या तिरू, शिवाजी नेवारे हे पूजा करून आखर बांधतात आणि जनावरांचे वैद्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खिल्या मुठवा देवाची पूजा करतात. त्यानंतर शेणाच्या ढिगावरून गावातील गायी, बैल व शेळ्या नेल्या जातात. कोंबडीचे पिल्लू व अंडे सुरक्षित राहिले तर गायगोधन साधले असे म्हणतात. शेंड्याची परवानगी घेऊन घोन्नाड जातीचे गवत गावकरी उचलून नेतात आणि गोठ्यात ठेवतात. खिल्या मुठवा हा देव गुरांचे रक्षण करतो असे मानले जाते. खिल्या मुठवा हा गुरांचा वैद्य असून भिवंशन देवाचा भाऊ असल्याचे सांगितले जाते.