गोंडी भाषा लिपीला मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न आवश्यक
By admin | Published: June 30, 2016 01:38 AM2016-06-30T01:38:44+5:302016-06-30T01:38:44+5:30
गोंडवाना गोटूल सेना गडचिरोली व गोंडी संस्कृती बचाव समिती परवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने २७ जून रोजी मेंढालेखा येथे गोंडी भाषा लिपी कार्यशाळा घेण्यात आली.
सुखरंजन उसेंडी यांचे प्रतिपादन : मेंढालेखा येथे कार्यक्रम
धानोरा : गोंडवाना गोटूल सेना गडचिरोली व गोंडी संस्कृती बचाव समिती परवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने २७ जून रोजी मेंढालेखा येथे गोंडी भाषा लिपी कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन सेवानिवृत्त शिक्षक बागसाय उसेंडी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा होते. मार्गदर्शक म्हणून गोंडी संस्कृती बचाव समितीचे अध्यक्ष मनीरावण दुग्गा, गोंडवाना गोटूल सेना प्रमुख अॅड. सुखरंजन उसेंडी, नंदकिशोर नैताम आदी उपस्थित होते.
यावेळी अॅड. सुखरंजन उसेंडी म्हणाले की, गोंडी भाषा लिपी पुरातन काळातील आहेत. त्यामुळे गोंडी भाषा लिपीला मान्यता मिळावी, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. गोंड आदिवासींचे साहित्य शालेय अभ्यासक्रमात समाविष्ठ करून आपल्या मातृभाषेत शिक्षण मिळाल्यास ज्ञान अद्यावत करणे सोपे जाईल. गोंडी भाषा लिपी संस्कृती रितीरिवाज जतन करणे काळाची गरज आहे, असे ते म्हणाले. या कार्यशाळेत ४५ युवक, युवती सहभागी झाले होते. संचालन उत्तम आतला, प्रास्ताविक नंदकिशोर नैताम तर आभार विनोद करंगामी यांनी मानले. कार्यक्रमासाठी निकेश वालको, विनोद करंगामी, तुळशिराम नैताम, रेशमा गावडे, रूपाली धुर्वे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)