‘गोंडवाना’च्या समित्या बरखास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 01:14 AM2017-09-10T01:14:48+5:302017-09-10T01:14:58+5:30
चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यासाठी २ आॅक्टोबर २०११ रोजी स्थापन झालेल्या गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात शासनाच्या परिपत्रकानुसार गठित करण्यात आलेल्या विद्यापीठ अधिसभा,...
दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यासाठी २ आॅक्टोबर २०११ रोजी स्थापन झालेल्या गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात शासनाच्या परिपत्रकानुसार गठित करण्यात आलेल्या विद्यापीठ अधिसभा, विद्वत, व्यवस्थापन व अभ्यास मंडळांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे या समित्या ३१ आॅगस्ट २०१७ रोजी बरखास्त करण्यात आल्या आहे. निवडणुकीची अधिसूचना निर्गमित झाल्यानंतर सदर समित्या नव्याने गठित करण्यासाठी कार्यवाहीस सुरुवात होणार आहे.
गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात एकूण २३८ महाविद्यालये आहेत. त्यापैकी विनाअनुदान तत्त्वावर असलेल्या ३० महाविद्यालयांची मान्यता विद्यापीठ प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच काढल्याने हे महाविद्यालय बंद झाले आहेत. विद्यापीठाअंतर्गत विविध अभ्यासक्रम चालविले जात असून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यापीठाच्या कार्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे, तसेच शिक्षणाची प्रक्रिया सुलभ व्हावी या हेतूने विद्यापीठस्तरावर अधिसभा, विद्वत आणि व्यवस्थापन परिषद आदी समित्या गठित केल्या जातात. याशिवाय विविध अभ्यासक्रमांचे मंडळही गठित केले जाते. विद्यापीठाच्या स्थापनेनंतर ११२ बी अंतर्गत शासनाने अडीच वर्षाकरिता या समित्या गठित केल्या होत्या. मात्र आता या समित्यांचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे ३१ आॅगस्ट २०१७ या समित्या बरखास्त करण्यात आल्या आहेत.
कुलगुरूंकडून विद्वत परिषदेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून विद्यापीठस्तरावरील एक व महाविद्यालयस्तरावरील एक अशा दोन प्राध्यापकांची निवड करण्यात येणार आहे. तसेच निवडणुकीसाठी विद्यापीठ प्रशासनाने पदवीधरांची प्राथमिक मतदार यादी जाहीर केली आहे. याकरिता आरक्षणही जाहीर करण्यात आले आहे. यात १६ हजार ४६२ मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.
विद्यापीठाच्या सर्व समित्यांची निवडणुकीची अधिसूचना येत्या आठ दिवसात जाहीर होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर ४५ ते ४९ दिवसांत ही सर्व निवड प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे, अशी माहिती गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव दीपक जुनघरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. विद्यापीठाच्या समित्यांवर वर्णी लावण्यासाठी काही प्राध्यापकांनी धडपड सुरू केली आहे.
‘तो’ निर्णय शासनस्तरावर होईल
चंद्रपूर व गडचिरोली हे दोन्ही जिल्हे मिळून एकूण २३८ महाविद्यालये गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित आहेत. त्यापैकी ३० महाविद्यालये विद्यापीठ प्रशासनाने अलिकडेच बंद केली आहेत. या महाविद्यालयातील मान्यताप्राप्त प्राध्यापकांचे नाव मतदार म्हणून यादीत असेल तर ते आता होणाºया विविध समित्यांच्या निवडणुकीसाठी पात्र होणार की नाही, याबाबतचा निर्णय शासन घेणार आहे. यासंदर्भात गोंडवाना विद्यापीठाने राज्यपाल व संचालक, उच्च व तंत्रशिक्षण महाराष्टÑ शासन यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. बंद केलेल्या ३० महाविद्यालयातील प्राध्यापकांबाबतचा निर्णय शासनस्तरावरूनच होणार आहे.