गोंडवानाच्या सुरक्षा रक्षकांनी सुरू केले उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2021 05:00 AM2021-11-11T05:00:00+5:302021-11-11T05:00:39+5:30

आपली व्यथा मांडताना सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून थर्ड आय सिक्युरिटी एजन्सीकडे आम्ही काम करत होतो. पण आधी केवळ ५ हजार रुपये रोख पगार दिला जात होता. नंतर विद्यापीठाच्या हस्तक्षेपानंतर त्यांच्या बँक खात्यात १० हजार ८०८ रुपये टाकले जाऊ लागले. पण त्या रकमेतून दर महिन्याला २ हजार रुपये परत मागितले जात होते. न दिल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली जात होती. दरम्यान, या कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाच्या शिफारसपत्राने चंद्रपूर सुरक्षारक्षक मंडळाकडे नोंदणी केली.

Gondwana security guards start hunger strike | गोंडवानाच्या सुरक्षा रक्षकांनी सुरू केले उपोषण

गोंडवानाच्या सुरक्षा रक्षकांनी सुरू केले उपोषण

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या सात ते आठ वर्षांपासून गोंडवाना विद्यापीठात सुरक्षारक्षक म्हणून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे थर्ड आय या सिक्युरिटी एजन्सीने आर्थिक शोषण केले. आता सुरक्षारक्षक मंडळाकडे नोंदणी केल्यानंतर विद्यापीठाने त्यांची थेट सेवा घेण्यास नकार देत डावलले, असा आरोप करत १५ जणांनी बुधवारपासून विद्यापीठाच्या गेटवर साखळी उपोषण सुरू केले. 
त्यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून थर्ड आय सिक्युरिटी एजन्सीकडे आम्ही काम करत होतो. पण आधी केवळ ५ हजार रुपये रोख पगार दिला जात होता. नंतर विद्यापीठाच्या हस्तक्षेपानंतर त्यांच्या बँक खात्यात १० हजार ८०८ रुपये टाकले जाऊ लागले. पण त्या रकमेतून दर महिन्याला २ हजार रुपये परत मागितले जात होते. न दिल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली जात होती. दरम्यान, या कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाच्या शिफारसपत्राने चंद्रपूर सुरक्षारक्षक मंडळाकडे नोंदणी केली. त्यामुळे थर्ड आय एजन्सीच्या आर्थिक जाचातून मुक्तता होऊन थेट मंडळामार्फत विद्यापीठाकडून पगार मिळेल अशी आशा त्यांना होती. मात्र मंडळाने १ नोव्हेंबरपासून रुजू करून घेण्यास सांगितल्यानंतरही विद्यापीठाने रुजू करून न घेता थर्ड आय एजन्सीसोबतचा व्यवहार सुरूच ठेवल्याने आपल्याला नोकरीतून डावलले, असा आरोप करत त्यांनी उपोषण सुरू केले.

सुरक्षा एजन्सीच अनधिकृत?
वास्तविक गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा मंडळाचा कायदा लागू असल्यामुळे या मंडळाकडे नोंदणी असलेल्या किंवा राज्य शासनाकडून सवलतप्राप्त सुरक्षारक्षक एजन्सीलाच येथे सेवा देता येते. असे असताना सध्या विद्यापीठाचा कंत्राट मिळवलेली थर्ड आय एजन्सी या नियमात बसत नसल्यामुळे या जिल्ह्यात सेवा देण्यास पात्रच नसल्याचा आरोप सदर कर्मचाऱ्यांनी केला आहे.

विद्यापीठानेच केली हाेती शिफारस
सदर १५ सुरक्षा रक्षकांची चंद्रपूर सुरक्षा मंडळाकडे नाेंदणी करण्यासाठी गाेंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डाॅ.अनिल चिताडे यांनीच शिफारसपत्र दिले हाेते. त्यानुसार या कर्मचाऱ्यांची नाेंदणीही झाली. त्यामुळे विद्यमान कंत्राट संपताच त्यांना विद्यापीठाकडून नियुक्तीपत्र मिळण्याची शक्यता आहे.

आम्ही ई-टेंडरिंग करूनच ११ महिन्यांसाठी सिक्युरिटी एजन्सीला कंत्राट देतो. थर्ड आय एजन्सी ही नोंदणीकृत असून तिचा कंत्राट फेब्रुवारी २०२२ पर्यंत आहे. त्यापूर्वी त्यांचा कंत्राट मोडून दुसऱ्या लोकांना हे काम देण्यासाठी व्यवस्थापन मंडळाकडून मंजुरी घ्यावी लागते. हे काम तत्काळ होणारे नाही. त्यामुळे उपोषण करणाऱ्यांनी ही बाब समजून घेतली पाहिजे.
- डॉ.अनिल चिताडे
प्र. कुलसचिव, गोंडवाना विद्यापीठ

 

Web Title: Gondwana security guards start hunger strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.