गोंडवाना विद्यापीठात ‘बार्टी’चे स्पर्धा परीक्षा केंद्र मंजूर
By दिलीप दहेलकर | Published: September 26, 2023 05:04 PM2023-09-26T17:04:17+5:302023-09-26T17:10:08+5:30
मोठ्या शहरातील तज्ज्ञ गडचिरोलीत देणार विद्यार्थ्यांना परीक्षेचे धडे
गडचिरोली : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र येथील गोंडवाना विद्यापीठाला मंजूर झाले आहे. एमपीएसी परीक्षेच्या सर्व विषयाचे तज्ज्ञ गडचिरोली येथे अनुसूचित जातीच्या उमेदवारांना बँक (आयबीपीएस), रेल्वे, एलआयसी व तत्सम् स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन करणार आहेत. सदर परीक्षा केंद्र व कोचिंगमुळे गडचिरोलीसारख्या मागास जिल्हयातील विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी बनून प्रशासकीय सेवेत जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
अनुसूचित जातीच्या उमेदवारांना बँक (आयबीपीएस), रेल्वे, एलआयसी व तत्सम स्पर्धा परीक्षेच्या निशुल्क पूर्वप्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज बार्टीच्या संकेतस्थळावर अर्ज भरणे अनिवार्य आहे. प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने असून, याबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या तसेच ‘बार्टी’च्या संकेतस्थळावर आहे. विद्यापीठ आणि ‘बार्टी’मध्ये स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र चालविण्याबाबत सामंजस्य करार झाला आहे. याअंतर्गत हे केंद्र मंजूर झाले आहे. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांच्या सहकार्याने ही कार्यवाही पूर्ण झाली. अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर विद्यार्थ्यांना विद्यापीठात ही संधी मिळाली आहे.
स्पर्धा परीक्षेचे निशुल्क कोचिंग विद्यापीठाच्या क्षेत्रातील चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या २०० विद्यार्थ्यांना सहा महिन्याचे मोफत स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन मिळणार आहे. यामध्ये १५० विद्यार्थी बॅकींग व ५० विद्यार्थ्यांना एमपीएसी परीक्षेचे काेचिंग मिळणार आहे. सदर विद्यार्थ्यांना सहा महिने महिन्याला सहा हजार रूपये विद्यावेतन मिळणार आहे.
सदर प्रशिक्षण पूर्णतः निःशुल्क असून, प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च बार्टी पुणे मार्फत केला जाणार आहे. इच्छूक प्रशिक्षणार्थीच्या प्राप्त अर्जांमधून निकषांच्या आधारे अर्जांची छाननी करून उमेदवारांना प्रवेश दिला जाणार आहे. बार्टीच्या या स्पर्धा परीक्षा केंद्रामुळे चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यातील होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना एमपीएसी परीक्षेची तयारी चांगल्या पद्धतीने करता येणार आहे.
- डॉ. अनिल हिरेखण, कुलसचिव, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली.