गोंडवाना विद्यापीठाला विशेष दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 07:20 PM2020-09-25T19:20:46+5:302020-09-25T19:22:27+5:30
चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्याच्या वनसंपदेतून लोकांचा विकास करण्यासाठी विद्यापीठातून प्रयत्न झाले पाहिजे. त्यासाठी या विद्यापीठाला शासनाकडून विशेष दर्जा प्राप्त होण्यासाठी आपण प्रयत्न करणार, अशी माहिती गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.श्रीनिवास वरखेडी यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तब्बल नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) ‘१२-बी’ चा दर्जा मिळाल्याने विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. हे विद्यापीठ आदिवासीबहुल व वनव्याप्त क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्याच्या वनसंपदेतून लोकांचा विकास करण्यासाठी विद्यापीठातून प्रयत्न झाले पाहिजे. त्यासाठी या विद्यापीठाला शासनाकडून विशेष दर्जा प्राप्त होण्यासाठी आपण प्रयत्न करणार, अशी माहिती गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.श्रीनिवास वरखेडी यांनी दिली.
१२-बी चा दर्जा मिळाल्यानंतर डॉ.वरखेडी यांनी गुरूवारी पत्र परिषद घेतली. यावेळी कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले, अधिष्ठाता डॉ.सुरेश रैवतकर, डॉ.श्रीराम कावळे आदी उपस्थित होते.
गोंडवाना विद्यापीठाला यूजीसीकडून १२-बी चा दर्जा मिळाल्यामुळे राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियानांतर्गत विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांना अनुदान प्राप्त होणार आहे. विविध भौतिक सुविधा व इतर नवीन विकास कामे करण्यासाठी यूजीसीकडून निधी उपलब्ध होणार आहे, असे डॉ.वरखेडी यांनी सांगितले. सकारात्मक दृष्टिकोनातून सामूहिक प्रयत्नाने या विद्यापीठाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. आदिवासीबहुल भागात हे विद्यापीठ असल्याने आदिवासींची भाषा, परंपरा, संस्कृती व येथील वनातून रोजगार निर्मितीसाठी विद्यापीठाच्या वतीने उपक्रम राबविण्यावर भर दिला जाईल. त्याअनुषंगाने या विद्यापीठाला शासनाकडून विशेष दर्जा मिळणे गरजेचे आहे.
एस.एन.डी.टी. विद्यापीठ मुंबईला महिला विद्यापीठ म्हणून विशेष दर्जा देण्यात आला. याच धर्तीवर गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाला आदिवासीबहुल व वनव्याप्त क्षेत्र या मुद्यावर विशेष दर्जा शासनाकडून मिळावा, यासाठी आपला प्रयत्न राहणार असून लवकरच यासंदर्भातील परिपूर्ण प्रस्ताव विद्यापीठाच्या वतीने शासनाकडे पाठविणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांनी सांगितले.
३० महाविद्यालये अनुदानासाठी पात्र
गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्यातील एकूण ३० महाविद्यालयाचे अकॅडमीक ऑडीट झाले असून यातील सात कॉलेज १२-बी च्या अनुदानासाठी पात्र झाले आहे. सर्वच ३० ही कॉलेज ‘अ’ श्रेणीमध्ये आहेत. त्यामुळे या महाविद्यालयांना १२-बी अंतर्गत शासनाचे अनुदान मिळणार आहे, अशी माहिती प्रभारी कुलगुरू डॉ.वरखेडी यांनी दिली. विद्यापीठ कॅम्पसमध्ये विविध नावीण्यपूर्ण उपक्रम राबविण्यासोबतच विकास कामाला गती देऊन या विद्यापीठाचा नावलौकीक करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे ते म्हणाले.