आंदोलनाने गोंडवाना विद्यापीठाचे कामकाज ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:07 AM2019-06-19T00:07:56+5:302019-06-19T00:08:47+5:30
विद्यापीठात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या मुख्य मागणीसाठी गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी नागपूर येथील उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विद्यापीठात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या मुख्य मागणीसाठी गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी नागपूर येथील उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढला. या मोर्चात उपस्थित राहण्यासाठी सर्वच कर्मचारी गेल्याने मंगळवारी विद्यापीठाचे काम ठप्प पडले होते.
राज्यभरातील विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांनी टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केले आहे. १०, ११ व १२ जून रोजी विद्यापीठातील कर्मचाºयांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. १३ ते १७ जूनपर्यंत विद्यापीठासमोर निदर्शने देऊन शासनाचे लक्ष वेधले. मात्र शासनाने दुर्लक्ष केल्याने ठरलेल्या नियोजनानुसार विद्यापीठातील कर्मचाºयांनी नागपूर येथील उच्च शिक्षण सहसंचालक यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, राष्टÑसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर व संस्कृत विद्यापीठ रामटेकच्या जवळपास ९०० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. नागपूर येथील विद्यापीठ ते सहसंचालक कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन सहसंचालकांना देण्यात आले.
या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गोंडवाना विद्यापीठातील सर्वच कर्मचारी गेले होते. यासाठी सामूहिक रजा घेतली.
आदल्या दिवशी सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता सर्व विभागांच्या चाव्या विभाग प्रमुखांकडे सोपविण्यात आल्या. त्यामुळे विद्यापीठातील कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव यांच्या कार्यालयामध्ये सुध्दा एकही कर्मचारी नव्हता. सर्व विभागांमध्ये शुकशुकाट पसरला होता.