‘गोंडवाना’ची तीन बक्षिसांवर मोहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 06:00 AM2019-12-07T06:00:00+5:302019-12-07T06:00:18+5:30
सिने अभिनेता श्रेयस तळपदे हे समारोपीय कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. श्रेयस यांच्यासोबत बक्षीसासह छायाचित्र काढण्याची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत होती. आपल्या विद्यापीठाचे नाव बक्षीसासाठी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी टाळ्यांच्या कडकडाटात तसेच ढोलताशे वाजवून आनंद व्यक्त करीत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठात २ ते ६ डिसेंबरदरम्यान आयोजित आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सवाचा शुक्रवारी (दि.६) मोठ्या उत्साहात समारोप झाला. सिने अभिनेता श्रेयस तळपदे याच्या उपस्थितीने या समारोपीय समारंभाची रंगत वाढली. या महोत्सवात गोंडवाना विद्यापीठाने तीन स्पर्धांमध्ये बक्षीस मिळविले.
स्थळचित्र व सांस्कृतिक मिरवणूक या दोन स्पर्धांमध्ये गोंडवाना विद्यापीठाने द्वितीय क्रमांक पटकाविला, तर माती शिल्पकाम मध्ये तृतीय क्रमांक पटकावला. या महोत्सवात भारतीय सुगम संगीत, पोस्टर मेकिंग, नकला, भारतीय समूह गायन, चिकटकला, एकांकिका, प्रश्नमंजूषा, व्यंगचित्रे, मूकनाट्य, वक्तृत्व स्पर्धा, तालवाद्य, स्वरावाद्य, पाश्चिमात्य एकलगायन, पाश्चिमात्य समूहगायन, प्रहसन, भारतीय शास्त्रीय नृत्य, भारतीय शास्त्रीय गायन, वादविवाद स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, लोक/आदिवासी नृत्य, प्रश्नमंजूषा या स्पर्धा घेण्यात आल्या.
२ डिसेंबर पासून स्पर्धा असल्याने १ डिसेंबरलाच बहुतांश विद्यार्थी विद्यापीठात दाखल झाले होते. २ डिसेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत चाललेल्या विविध स्पर्धांमध्ये डोळ्याचे पारणे फिटतील, असे कलाविष्कार सादर केले. या माध्यमातून गडचिरोलीकरांना राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कलागुण बघता आले. असे स्पर्धक तयार करण्याची प्रेरणा मिळाली. सहा दिवस विद्यापीठ परिसर गजबजून गेला होता.
यशस्वी आयोजनाची विद्यार्थ्यांनी दिली पावती
आंतरविद्यापीठीय युवा महोत्सव आयोजित करण्याची संधी गोंडवाना विद्यापीठाला प्राप्त झाली. या संधीचे सोने करीत विद्यापीठाने स्पर्धांचे यशस्वीपणे आयोजन केले. याची पावती स्पर्धेसाठी आलेल्या दुसऱ्या विद्यापीठातील विद्यार्थी व मान्यवर यांनी दिली. समारोपीय कार्यक्रमाच्या दिवशी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी व मान्यवरांनी विद्यापीठाच्या नियोजनाची प्रशंसा केली.
पुढील वर्षी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात स्पर्धांचे आयोजन होणार आहे. कुलगुरू डॉ. कल्याणकर यांच्या कडून नांदेड विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना ध्वज हस्तांतरीत करण्यात आला.
श्रेयससोबत छायाचित्र काढण्याची उत्सुकता
सिने अभिनेता श्रेयस तळपदे हे समारोपीय कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. श्रेयस यांच्यासोबत बक्षीसासह छायाचित्र काढण्याची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत होती. आपल्या विद्यापीठाचे नाव बक्षीसासाठी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी टाळ्यांच्या कडकडाटात तसेच ढोलताशे वाजवून आनंद व्यक्त करीत होते.
तरूणांचे हात उगारण्यासाठी नाही तर उभारण्यासाठी असल्याची प्रचिती- कुलगुरू
पाच दिवस चाललेल्या युवा महोत्सवात तरूणाईचा उत्साह वाखाण्याजोगे होता. मस्ती करीत असतानाच त्यांना जबाबदारीचे भानही असल्याचे दिसून येत होते. प्रत्येक कलावंताने त्याच्या भुमिकेसाठी स्वत:ला समर्पीत केल्याचे दिसून येत होते. यावरून आजच्या युवकांचे हात उगारण्यासाठी नाही तर नवीन काही तरी उभारण्यासाठी आहेत. याची प्रचिती या युवा महोत्सवाच्या माध्यमातून झाली, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांनी केले.
विद्यापीठ लहान असल्याने युवा महोत्सवाची जबाबदारी पेलेल काय, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र आमच्या क्षमतेप्रमाणे चांगले करण्याचा प्रयत्न विद्यापीठाने करीत यशस्वी आयोजन केले आहे. यावरून गोंडवाना विद्यापीठावर सोपविलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यास आम्ही समर्थ आहोत, याची खात्री झाली आहे, असा विश्वासही डॉ. कल्याणकर यांनी व्यक्त केला.