लग्नापूर्वीच गोपाल व कुंदावर नियतीचा घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:01 AM2019-05-15T00:01:10+5:302019-05-15T00:01:46+5:30
रितीरिवाजाप्रमाणे लग्न करून सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या जोडप्यावर नियतीने डाव साधला. अहेरीजवळ सोमवारी रात्री झालेल्या अपघातात लग्नाच्या तयारीला लागलेले गोपाल व कुंदा हे दोघेही ठार झाले. त्यामुळे या दोघांनीही सुखी संसाराचे पाहिलेले स्वप्न अधुरेच राहिले.
प्रतीक मुधोळकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : रितीरिवाजाप्रमाणे लग्न करून सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या जोडप्यावर नियतीने डाव साधला. अहेरीजवळ सोमवारी रात्री झालेल्या अपघातात लग्नाच्या तयारीला लागलेले गोपाल व कुंदा हे दोघेही ठार झाले. त्यामुळे या दोघांनीही सुखी संसाराचे पाहिलेले स्वप्न अधुरेच राहिले.
गोपाल महतो हा मूळचा अहेरीचा रहिवासी आहे, तर कुंदा गावडे ही एटापल्ली तालुक्यातील बिड्री गावची रहिवासी आहे. गोपाल व कुंदा एकमेकांना खुप वर्षांपासून ओळखत होते. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. गोपाल हा अहेरी उपजिल्हा रूग्णालयात कंत्राटी तत्वावर कार्यरत होता. तर कुंदा हिने हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम केला होता. एप्रिल महिन्यात गोपाल व कुंदाने नोंदणी पध्दतीने विवाह केला. कुंदा ही आदिवासी समाजाची असल्याने ती गावात लग्नाचा छोटेखानी कार्यक्रम करणार होती. त्यानंतर १० जून रोजी अहेरी येथे स्वागत समारंभाचा कार्यक्रम ठेवण्याचे ठरले होते. याच संबंधात कुंदाच्या नातेवाईकांसोबत चर्चा करण्यासाठी दोघेही अहेरीवरून बिड्री गावाकडे दुचाकीने निघाले होते. मात्र अहेरीपासून अवघ्या तीन किमी अंतरावर दोन दुचाकींची समारोसमोर धडक झाली. यात गोपाल हा जागीच ठार झाला. कुंदा सुध्दा गंभीर जखमी झाली होती. कुंदाला अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला नागपूर येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान कुंदाचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. गोपाल व कुंदाच्या अकाली निधनाने महतो व गावडे परिवारावर दु:खाचे डोंगर कोसळले आहे. गोपाल अहेरी रूग्णालयात काम करीत असल्याने येथील कर्मचाऱ्यांवर शोककळा पसरली आहे. मनमिळावू स्वभावाचा व प्रत्येकीच्या मदतीला धाऊन जाणारा कर्मचारी म्हणून गोपालची रूग्णालयात ओळख होती. दोघांवरही अहेरीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेल्मेटने वाचले असते प्राण
अहेरीजवळ झालेल्या अपघातात गोपाल, कुंदा यांच्यासह दुसरा दुचाकीस्वार संतोष दुधलवार हे तिघे ठार झाले. या तिघांच्याही डोक्याला मार लागला होता. वाहतुकीचे नियम पाळून दुचाकीस्वारांनी डोक्यात हेल्मेट वापरले असते तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते. अहेरी-आलापल्ली मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून रात्रीचा प्रवास धोकादायक व खडतर झाला आहे.