गोपाळ समाज उपेक्षितच

By Admin | Published: June 25, 2017 01:26 AM2017-06-25T01:26:30+5:302017-06-25T01:26:30+5:30

भारतातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सोयीसुविधा मिळण्याचा अधिकार व हक्क आहे.

The Gopal community is oblivious | गोपाळ समाज उपेक्षितच

गोपाळ समाज उपेक्षितच

googlenewsNext

जात प्रमाणपत्र मिळेना : शासकीय योजना पोहोचल्या नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भारतातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सोयीसुविधा मिळण्याचा अधिकार व हक्क आहे. शिवाय शासकीय योजनेचा लाभ घेऊन आर्थिक स्तर उंचाविण्याची संविधानात तरतूद आहे. मात्र अशिक्षितपणामुळे आरमोरी नगर पंचायत क्षेत्रात येणाऱ्या व आरमोरीपासून चार किमी अंतरावर असलेला गोपाळ समाज विकासापासून वंचित आहे. सदर गोपाळ समाजाच्या वस्तीत मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असून येथील नागरिक जात प्रमाणपत्रापासून वंचित असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.
आरमोरीपासून चार किमी अंतरावर असलेल्या गोपाळ समाजाच्या वस्तीत जवळपास २५ कुटूंब असून येथील लोकसंख्या १०० आहे. येथील काही नागरिक नगर पंचायतीचे मतदार असून येथील लोकांकडे केवळ मतदान ओळखपत्र आहे. या पलिकडे इतर कोणतेही महत्त्वपूर्ण कागदपत्रे त्यांच्याकडे नाहीत. गावागावात फिरून गारूडीचा खेळ करण्यासोबत मोलमजुरी करून उपजिविका येथील नागरिक भागवित आहेत. सदर वस्तीत पक्के रस्ते, नाल्यांचा अभाव आहे. शासनाने वैयक्तिक लाभाच्या विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. मात्र येथील एकाही नागरिकाला संजय गांधी व इतर वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळत नाही. आरमोरी ग्राम पंचायत असताना इंदिरा गांधी आवास योजनेतून या वस्तीतील काही मोजक्या कुटुंबांना घरकूल मिळाले. मात्र नगर पंचायत झाल्यापासून येथे घरकूल मिळाले नाही. ५० वर्षांपासून या वस्तीत गोपाळ समाज बांधवांचे वास्तव्य असतानासुद्धा येथील नागरिक विविध मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधी विकास होत असल्याचा कांगावा करीत असले तरी गोपाळ समाजाच्या वस्तीकडे बघितले असता, विकासाची प्रक्रिया तळागाळापर्यंत पोहोचली नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते. आजवर जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी या गोपाळ वस्तीला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेण्याचे सौदार्य दाखविले नाही.
गडचिरोली मार्गावरील गाढवी नदीजवळ ही वस्ती असली तरी प्रशासनाचे या वस्तीच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. रवी दिलीप नेवारे हा मुलगा गतवर्षी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला. मात्र जात प्रमाणपत्र नसल्याने पुढील शिक्षणापासून तो वंचित असल्याची माहिती आहे.

आरमोरी न. पं. क्षेत्रातील वॉर्ड क्र. ७ मध्ये समावेश असलेल्या गोपाळ समाजाच्या वस्तीत अनेक समस्या कायम आहेत. शिवाय येथील नागरिक हलाखीचे जीवन जगत आहेत. सदर वस्तीतील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी या समाजातील नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळवून द्यावे, उदर्निवाहासाठी दोन एकर शेती शासनातर्फे मिळवून द्यावी तसेच इतर मूलभूत सुविधा व शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी पाऊले उचलावी.
- चंदू वडपल्लीवार,
माजी सभापती, पं. स. आरमोरी

Web Title: The Gopal community is oblivious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.