गोरजाई डोहाने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 01:19 AM2018-04-16T01:19:49+5:302018-04-16T01:19:49+5:30

वैलोचना व खोब्रागडी नदीच्या संगमावर असलेल्या गोरजाई डोहाने एप्रिल महिन्यात यावर्षी पहिल्यांदाच तळ गाठण्यास सुरूवात केली आहे.

Gorgias reach the destination | गोरजाई डोहाने गाठला तळ

गोरजाई डोहाने गाठला तळ

Next
ठळक मुद्देतीव्र पाणी टंचाईचे संकेत : एवढा डोह कधीच आटला नसल्याचे वयोवृद्धांचे मत

लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : वैलोचना व खोब्रागडी नदीच्या संगमावर असलेल्या गोरजाई डोहाने एप्रिल महिन्यात यावर्षी पहिल्यांदाच तळ गाठण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वैलोचना, खोब्रागडी नदीच्या संगमावर मानव समाजाचे दैवत असलेले गोरजाई मातेचे मंदिर आहे. पूर्वी हे मंदिर नदी पात्राच्या मधोमध होते. ते उद्ध्वस्त झाल्याने नागवंशीय राजाने हे मंदिर नदी किनाऱ्यावर बांधले, अशी आख्यायिका या मंदिराची सांगितली जाते. गोरजाई मंदिराच्या जवळच एक डोह आहे. त्यामुळे या डोहाला गोरजाई डोह असे संबोधले जाते.
बाराव्या शतकात वैरागड येथे चंद्रपूरचा गोंडराजा बल्लाळशहाचे अधिष्ठान होते. राजवाड्याची पाण्याची गरज गोरजाई डोह पूर्ण करीत होता. त्याचबरोबर वैरागड परिसरातील मच्छीमार करणारे नागरिकही या डोहात मच्छीमारीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत असल्याचे सांगितले जाते.
यावर्षी गोरजाई डोहातील पाण्याच्या बाहेर जे खडक दिसत आहेत, त्या ठिकाणी भर उन्हाळ्यात दगडांवरून पाच ते सहा फूट पाणी राहत होता, असे वयोवृध्द नागरिक सांगतात. मात्र मागील काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. त्याचबरोबर भूगर्भातील जलाशयाचा उपसा वाढला आहे. परिणामी नदीची पाणी पातळी सुध्दा कमी होत आहे. पाणी पातळी कमी झाल्याने गोरजाई डोहात असलेले खडक बाहेर निघण्यास सुरूवात झाली आहे. एप्रिल महिन्यात ही स्थिती आहे. मे व जून महिन्यात सदर डोहात अतिशय कमी पाणी राहणार आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास गोरजाई डोह भर उन्हाळ्यात कायमचा आटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
माझ्या आयुष्यात गोरजाई डोहाचे पाणी एवढे कधीच कमी झाले नव्हते, अशी माहिती वयोवृध्द नागरिक रामचंद्र क्षिरसागर यांनी दिली.
 

Web Title: Gorgias reach the destination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.