गोसीखुर्दचे पाणी वैनगंगेत सोडले
By admin | Published: May 23, 2016 01:31 AM2016-05-23T01:31:11+5:302016-05-23T01:31:11+5:30
भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे वैनगंगा नदीवरील पाणी योजनांना नवसंजीवणी मिळाली आहे.
नळ योजनांना नवसंजीवनी : वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ
देसाईगंज : भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे वैनगंगा नदीवरील पाणी योजनांना नवसंजीवणी मिळाली आहे.
नोव्हेंबर महिन्यापासूनच पावसाने पाठ फिरविली होती. त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी रेकॉर्डब्रेक खालावली होती. वैनगंगा नदीवर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील ५० पेक्षा अधिक नळ योजना आहेत. अनेक नळ योजना पाण्याअभावी संकटात आल्या होत्या. शहरांना कमी पाण्याचा पुरवठा होऊ लागला होता. त्यामुळे गोसीखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांकडून होऊ लागली होती. त्यानंतर आठ दिवसांपूर्वी गोसीखुर्द धरणाचे पाणी वैनगंगेच्या पात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे वैनगंगेचा जलस्तर वाढला आहे. याचा लाभ या नदीवर असलेल्या योजनांना होणार आहे. जलस्तर वाढल्यानंतर देसाईगंज येथील बच्चे कंपनी, युवक पाण्यात पोहोण्याचा आनंद लुटत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी पहिल्यांदाच जलसंकट तीव्र झाले आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत गोसीखुर्द धरणाचे पाणी वैनगंगेच्या नदी पात्रात सोडण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (शहर प्रतिनिधी)