विकासासाठी शासन कटिबद्ध
By admin | Published: May 26, 2017 02:25 AM2017-05-26T02:25:22+5:302017-05-26T02:25:22+5:30
राज्य शासनाने केवळ अडीच वर्षात शेती क्षेत्रात सुमारे ४० हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. शाश्वत शेतीवर समृद्ध
संवाद यात्रा : देवराव होळी यांनी दिली पत्रपरिषदेत माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : राज्य शासनाने केवळ अडीच वर्षात शेती क्षेत्रात सुमारे ४० हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. शाश्वत शेतीवर समृद्ध शेतकऱ्याच्या माध्यमातून बळीराजाला कर्जमुक्त करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना त्यांना समजावून सांगण्यासाठी २५ ते २९ मे पर्यंत शिवार संवाद यात्रेचे आयोजन केले आहे, अशी माहिती आ. डॉ. देवराव होळी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
पंडित दीनदयाल यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त शिवार संवाद यात्रेचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या व केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संवाद यात्रा आयोजित केली आहे. अडीच वर्षांच्या कालावधीत सामान्य नागरिक, गरीब व्यक्ती यासाठी अनेक योजना शासनाने सुरू केल्या आहेत. महाराष्ट्र शासन शेती विकासाला प्राधान्य देत आहे. गडचिरोली जिल्ह्यात ४ हजार ५०० सिंचन विहिरींचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. जमीन समतोल करणे, तलाव व बोडीकरणाचे काम हाती घेणे, जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबविणे, गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
कृषी महोत्सव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बांबू क्षेत्राचा विकास, मनरेगामार्फत विविध योजना, फिरते पशु चिकित्सालय, मेंढी पालनाला प्रोत्साहन, शेतीमालाचे योग्य विपनण, फलोत्पादनाचा विकास, उन्नत शेती आदी योजना राबविल्या जात आहेत. शेतकऱ्यांना मोफत बियाणे, खते, कीटकनाशकांचाही पुरवठा केला जात असल्याची माहिती दिली.
पत्रकार परिषदेला जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर सेलुकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, महिला अध्यक्ष माधवी पेशट्टीवार, जि. प. सदस्य प्रा. रमेश बारसागडे, न. पं. चे गट नेता प्रशांत येगलोपवार, साईनाथ बुरांडे, माजी उपसभापती केशव भांडकेर, रवी बोमनवार, अनिल कुनघाडकर, आनंद गण्यारपवार, परितोष मंडल, श्रावण सोनटक्के आदी उपस्थित होते.