शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:48 AM2021-02-27T04:48:39+5:302021-02-27T04:48:39+5:30

मागील वर्षी एप्रिल व मे महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे आरमोरी विधानसभा क्षेत्रातील देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा व ...

Government announces financial assistance to farmers | शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत जाहीर

शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत जाहीर

Next

मागील वर्षी एप्रिल व मे महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे आरमोरी विधानसभा क्षेत्रातील देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा व कोरची तालुक्यातील रब्बी हंगामातील धान, उडीद, गहू, चणा, मका, वाटाणा आदी हजारो हेक्टरमधील शेतपिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लाॅकडाऊन करण्यात आले. बाजारपेठ बंदमुळे खरीप हंगामातील शेतमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. अशातच रब्बी हंगामातील पिकामुळे कशीतरी नुकसान भरपाई भरून निघेल, या आशेपोटी लावण्यात आलेले उपरोक्त रब्बी पीक अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे वाया गेले आहे.

दरम्यान, ३० टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करून तसा अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता. त्याअनुषंगाने आमदार कृष्णा गजबे यांनी ५ जून २०२०ला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन सादर करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन राज्याच्या महसूल व वन विभागाने मदत जाहीर केली आहे.

आरमोरी विधानसभा क्षेत्रातील देसाईगंज तालुक्यातील बाधित क्षेत्र ७०२.४३ हेक्टरकरिता ८९ लाख ९९ हजार ३०० रुपये, कुरखेडा तालुक्यातील बाधित क्षेत्र ३०७.९५ हेक्टरकरिता ३९ लाख ४३ हजार ५०० रुपये, आरमोरी तालुक्यातील बाधित क्षेत्र ७४७.९८ हेक्टरकरिता ७४ लाख १४ हजार २०० रुपये व कोरची तालुक्यातील बाधित क्षेत्र १६.९६ हेक्टरकरिता १ लाख ३८ हजार २०० रुपये नुकसान भरपाई मंजूर केली आहे. नागपूरच्या विभागीय आयुक्त यांनी आदेश काढून सदर निधी वाटप करण्यास मान्यता दिली आहे.

ही रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याने नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Web Title: Government announces financial assistance to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.