मसेलीच्या शासकीय आश्रमशाळेला मिळाला आयएसओ दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 05:00 AM2021-02-10T05:00:00+5:302021-02-10T05:00:36+5:30
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोलीअंतर्गत येणाऱ्या; पण जिल्ह्यातील उत्तर टोकावर असलेल्या दुर्गम भागातील या शाळेत असलेल्या सोयी-सुविधा सध्या सर्वांसाठी कौतुकाचा विषय झाला आहे. मागील शैक्षणिक सत्रापासून शालेय व्यवस्थापन व सोयी-सुविधांबाबत मुख्याध्यापक आर.एम. पत्रे यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी त्यासाठी मेहनत घेतली. वेद असोसिएट नागपूरचे निरीक्षक व पर्यवेक्षक विनोद कोल्हे, रोशन महल्ले व प्रजापती यांनी मुख्याध्यापक पत्रे यांना आयएसओ नामांकनाचे प्रमाणपत्र देऊन गौरविले.
लिकेश अंबादे
लाेकमत न्यूज नेटवर्क
कोरची : शासकीय आश्रमशाळा म्हटले की, वेगळेच आणि नकारात्मक चित्र अनेकांच्या नजरेसमोर येते. त्यातही गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त, दुर्गम भागातील आदिवासी आश्रमशाळा म्हटल्यावर तर काय हाल असतील, अशी कल्पना अनेक जण करतात; पण या कल्पनेच्या अगदी विपरीत चित्र असणारी शासकीय आश्रमशाला कोरची तालुक्यातील मसेली या गावात आहे. प्रसन्न वातावरण, शैक्षणिक व भौतिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या शाळेला आयएसओ नामांकन मिळाले आहे. हा सन्मान मिळविणारी ही गडचिरोली जिल्ह्यातील पहिली शासकीय आश्रमशाळा ठरली आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोलीअंतर्गत येणाऱ्या; पण जिल्ह्यातील उत्तर टोकावर असलेल्या दुर्गम भागातील या शाळेत असलेल्या सोयी-सुविधा सध्या सर्वांसाठी कौतुकाचा विषय झाला आहे. मागील शैक्षणिक सत्रापासून शालेय व्यवस्थापन व सोयी-सुविधांबाबत मुख्याध्यापक आर.एम. पत्रे यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी त्यासाठी मेहनत घेतली. वेद असोसिएट नागपूरचे निरीक्षक व पर्यवेक्षक विनोद कोल्हे, रोशन महल्ले व प्रजापती यांनी मुख्याध्यापक पत्रे यांना आयएसओ नामांकनाचे प्रमाणपत्र देऊन गौरविले. याकरिता सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी आशिष येरेकर यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभल्याचे शिक्षकवृंद सांगतात. येथे कार्यरत शिक्षक प्रभुदास लाडे, बी.एम. चौधरी, आशिष ढबाले, शिक्षिका विशाखा सोनवणे, वीणा जांभूळकर, उषा सोनकुसळे, भारती रहांगडाले, राजलक्ष्मी ढेकवार व अधीक्षक प्रमोद तुलावी इत्यादींसह महेश यादव, अंगत कुमरे, एम.टी. मडावी, हरसिंग बोगा, देवचंद कोंडाप व सुमन बांडेबाई इत्यादी कर्मचाऱ्यांनी त्यासाठी सहकार्य केले.
अशा आहेत आश्रमशाळेतील सुविधा
वेद असोसिएटच्या वतीने वेळोवेळी या शाळेचे मूल्यांकन केले. त्यामध्ये या आश्रमशाळेचे सुनियोजित व्यवस्थापन, विद्यार्थी व शिक्षकांकरिता निकषनिहाय सोयी-सुविधांची पूर्तता, शाळा सुशोभीकरण व सौंदर्यीकरण, आवश्यक व उपयुक्त सूचना फलके, कार्यालयीन दस्तऐवजांचे सुनियोजित व्यवस्थापन, वीज, पाणी, अन्नाचा नियोजनपूर्वक वापर, शाळेतील बोलक्या भिंती व संरक्षक भिंत ठेवणे, स्वागत व प्रवेश नोंदणी कक्ष, आकर्षक शालेय फुलबाग, गोंडी बोलीभाषा शब्दकोश, अभ्यासक्रमनिहाय वर्ग सजावट, डिजिटल व संगणक कक्ष, अद्ययावत प्रयोगशाळा व वाचनालय आदी बाबी या आश्रमशालेला आयएसओ नामांकन मिळवून देण्यासाठी कारणीभूत ठरल्या.
मसेलीसोबत भाडभिडी येथील आश्रमशाळेलाही आयएसओ नामांकन मिळाले आहे. याचे खरे श्रेय संबंधित मुख्याध्यापकांचेच आहे. कोणताही विशेष फंड न देता त्यांनी शाळेत विविध सुविधा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला. येत्या काळात आणखी असेच नवनवीन बदल दिसतील. भौतिक सुविधांसोबत शैक्षणिक दर्जा वाढण्याकडेही आम्ही लक्ष देणार आहोत.
-आशिष येरेकर (आयएएस),
प्रकल्प अधिकारी,
आदिवासी विकास विभाग गडचिरोली