शासकीय इमारतींची पुनर्बांधणी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:39 AM2021-08-23T04:39:43+5:302021-08-23T04:39:43+5:30
गडचिराेली : शहरातील अनेक शासकीय कार्यालयांच्या इमारतींची पुनर्बांधणी करणे गरजेचे आहे. ही कार्यालये जीर्ण झाल्याने बऱ्याच ठिकाणी गळती लागली ...
गडचिराेली : शहरातील अनेक शासकीय कार्यालयांच्या इमारतींची पुनर्बांधणी करणे गरजेचे आहे. ही कार्यालये जीर्ण झाल्याने बऱ्याच ठिकाणी गळती लागली आहे. परंतु, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी शासकीय अधिकाऱ्यांसह सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
कार्यालयातील तक्रारपेट्या गायब
आरमाेरी : शासकीय कार्यालयात काही वर्षांपूर्वी तक्रारपेट्या लावण्यात आल्या होत्या. मात्र, बहुतांश कार्यालयातील तक्रारपेट्या गायब झाल्या आहेत. दरम्यान, तक्रार करण्यासाठी सामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पीक विम्याच्या रकमेची प्रतीक्षा
गडचिराेली : जिल्ह्यातील शेकडो कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता; पण विम्याची रक्कम अद्याप मिळाली नाही. मागील वर्षी पावसाळ्यात पूर आल्याने उत्पन्नात घट झाल्याने शेतकरी विम्याची रक्कम केव्हा मिळेल, असा प्रश्न विचारला जात आहे.
शासकीय योजनांची अंमलबजावणी करावी
चामाेर्शी : आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यंदा कोरोनामुळे योजनांसाठी निधी मिळाला नाही. त्यामुळे तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात योजनाच पोहोचल्या नाहीत. राज्य शासनाने निधीची तरतूद करून जिल्ह्यासाठी देण्याची मागणी आदिवासी संघटनांनी निवेदनातून केली आहे. शासकीय योजनांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
बीएसएनएलमधील रिक्त पदे तत्काळ भरा
गडचिराेली : जिल्ह्यातील अनेक दूरभाष केंद्रातील प्रमुख अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे येथील कारभार राम भरोसे सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी अनेक तांत्रिक अडचणी आहेत. यामुळे त्या सोडविण्यासाठी रिक्त पदे भरावीत, अशी मागणी केली जात आहे.
मोकाट जनावरांचा चौकाचौकात ठिय्या
आष्टी : शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला. ही जनावरे रस्त्यावर उभी राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रात्रीच्या सुमारास वाहनधारकांचा अपघात होण्याचा धोका आहे. मोकाट जनावरांचा ग्रामपंचायतीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली. सध्या लाॅकडाऊनमुळे रहदारी कमी असल्यामुळे जनावरांसाठी रान माेकळे झाले आहे. त्यामुळे माेकाट गुरांची संख्या अधिकच वाढली आहे.