शासकीय स्वस्त धान्य दुकान झाले हायटेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2017 01:07 AM2017-03-31T01:07:30+5:302017-03-31T01:07:30+5:30
शासनातर्फे स्वस्त दरात रेशन कार्डधारकांना अन्नधान्याचा पुरवठा दर महिन्याला करण्यात येतो.
वितरण प्रणाली होणार पारदर्शक : कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न
सिराज पठाण कुरखेडा
शासनातर्फे स्वस्त दरात रेशन कार्डधारकांना अन्नधान्याचा पुरवठा दर महिन्याला करण्यात येतो. या वितरण व्यवस्थेत अनेकदा मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याच्या तक्रारी होत होत्या. यापुढे वितरण व्यवस्थेत पारदर्शकता निर्माण व्हावी व खऱ्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ व्हावा, यासाठी तालुक्यातील प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात पीओएस मशीनचा पुरवठा करण्यात आला आहे.
सदर मशीनमध्ये आधार लिंक करण्यात आलेल्या राशनकार्ड धारक किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याचा अंगठ्याचा ठसा मॅच झाल्यावरच त्याला योजनेचे धान्य पुरवठा केले जाणार आहे. त्यामुळे वितरण व्यवस्थेत पारदर्शकता निर्माण होऊन खऱ्या लाभार्थ्यालाच धान्य मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
शासकीय स्वस्त धान्य वितरण योजनेंतर्गत अंत्योदय, बीपीएल, एपीएल रेशनकार्ड धारकांना शासनातर्फे दर महिन्याला अत्यल्प दरात धान्याचा पुरवठा करण्यात येते. मात्र शासनाच्या या पुरवठा योजनेचा साखळीतील काही घटक पूर्ण लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचू देत नाही. ग्रामीण, दुर्गम भागात पुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत लाभार्थ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात येत असल्याची तक्रारी वारंवार शासनाकडे होत होत्या. या भ्रष्ट प्रवृत्ती आळा घालण्यासाठी योजनेत पारदर्शकता निर्माण करण्याच्या उद्देशाने अत्याधुनिक प्रणालीचा अंतरभाव करण्यात आला. कुरखेडा तालुक्यातील सर्व ९८ स्वस्त धान्य दुकानात पीओएस मशीनचा पुरवठा केलेला आहे. सदर मशीन थेट अन्नपुरवठा अधिकाऱ्यांशी जोडण्यात आलेली आहे.
शासनाला एक क्लिकवर संबंधित दुकानाची वितरणाची पूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. मशीनमुळे खऱ्या लाभार्थ्यांना ओळखणे सुलभ होणार असून पीओएस मशीनने लाभार्थ्यांना धान्याचा रोख स्वरूपातील खरेदीचा व्यवहार कार्ड क्रॅश करून बँक खात्यातून करता येणार आहे. त्यामुळे कॅशलेस व्यवहारालाही प्रोत्साहन ग्रामीण भागातून मिळण्यास मदत होणार आहे.