शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर नाही
By Admin | Published: September 16, 2015 01:58 AM2015-09-16T01:58:21+5:302015-09-16T01:58:21+5:30
केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची प्रचंड गळचेपी होत आहे. गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती.....
रायुकाँचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा : सलील देशमुख यांचा घणाघाती आरोप
गडचिरोली : केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची प्रचंड गळचेपी होत आहे. गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असताना कुठेही शेत जमिनीचे सर्वेक्षण होताना दिसून येत नाही. शेतकऱ्याच्या शेत मालाला योग्य भाव नाही. अतिवृष्टीबाबत शासनाकडून आर्थिक मदत नाही, तसेच चर्चाही नाही, एकूणच सरकारच्या वाटचालीवरून भाजप प्रणीत सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मुळीच गंभीर नाही, असा घणाघाती आरोप रायुकाँचे प्रदेश उपाध्यक्ष व विदर्भ प्रभारी सलील देशमुख यांनी केला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा गडचिरोलीच्या वतीने मंगळवारी पक्षाच्या कार्यालयात रायुकाँचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून देशमुख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राकाँचे जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून आशिष नाईक, जि. प. अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, राकाँचे कार्याध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, हेमंत जंबेवार, युनुस शेख, अजय कुंभारे, श्रीनिवास गोडसेलवार, रिंकू पापडकर, नितीन खोबरागडे, युकाँचे सिरोंचा तालुकाध्यक्ष सतिश भोगे आदी उपस्थित होते.
खोटे आश्वासन देऊन भाजपच्या नेत्यांनी केंद्र व राज्यात सत्ता मिळवली. सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक झाली, हे आता नागरिकांच्या लक्षात येत आहे. राकाँच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात भाजप सरकारच्या विरोधात जनजागृती करावी, तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर जनआंदोलन छेडावे, तसेच पक्ष संघटन मजबूत करावे, असे आवाहन सलील देशमुख यांनी यावेळी केले. याप्रसंगी सुरेश पोरेड्डीवार, भाग्यश्री आत्राम यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक श्रीनिवास गोडसेलवार, संचालन रिंकू पापडकर यांनी केले तर आभार अजय कुंभारे यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)