सरकारी धोरणाचा तेंदूपत्ता व्यवसायाला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:50 AM2018-05-14T00:50:23+5:302018-05-14T00:50:23+5:30
सरकारकडून तंबाखूजन्य पदार्थांवर विविध प्रकारचे कर आकारून हे पदार्थ महाग केले जात आहेत. याचा फटका बिडी व पर्यायाने तेंदूपत्ता व्यवसायाला बसत चालला असून याचा परिणाम यावर्षी दिसून आला आहे.
प्रदीप बोडणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : सरकारकडून तंबाखूजन्य पदार्थांवर विविध प्रकारचे कर आकारून हे पदार्थ महाग केले जात आहेत. याचा फटका बिडी व पर्यायाने तेंदूपत्ता व्यवसायाला बसत चालला असून याचा परिणाम यावर्षी दिसून आला आहे.
तेंदूपत्त्यापासून बिडी तयार केली जाते. बिडी तयार करण्यासाठी तंबाखूचा वापर केला जातो. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कॅन्सर होण्याची शक्यता अधिक राहते. त्यामुळे काही तंबाखूजन्य पदार्थांवर प्रतिबंध घातले आहेत. तर काही पदार्थांवर विविध प्रकारचे कर आकारून त्यांची किंमत वाढवून त्यांचे सेवन कमी होईल, असा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे. बिडीसाठी वापरल्या जाणाºया तंबाखूही महाग करण्यात आला आहे. पर्यायाने बिडी महाग होऊन त्याचे सेवन दरवर्षी घटत चालले आहे. बिडीचा वापर प्रामुख्याने राजस्थान, बिहार, गुजरात आदी राज्यांमधील नागरिक करतात. मात्र शासनाच्या जनजागृतीनंतर बिडीचा वापर कमी होत चालला आहे. परिणामी तेंदूपत्त्याची मागणी दरवर्षी घटत चालली असल्याचे दिसून येते. मागील वर्षी कंत्राटदारांनी चढत्या दराने तेंदूपत्ता खरेदी केला. त्यामुळे तेंदूपत्त्याच्या रॉयल्टीचा दर सुमारे २ हजार २०० रूपये प्रती शेकडापर्यंत पोहोचला होता. मात्र बाजारात उठाव नसल्याने तेंदूपत्त्याची विक्री झाली नाही. मागील वर्षीचाच काही तेंदूपत्ता शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षी तेंदूपत्ता कंत्राटदारांनी तेंदूपत्ता खरेदीकडे पाठ फिरविली. याचा परिणाम म्हणजे, काही ठिकाणचे तेंदूपत्त्याचे लिलाव झाले नाही. त्यामुळे तेथील व्यवसाय अडचणीत आला आहे. किमान मजुरी तरी मिळावी, या उद्देशाने मिळेल त्या किमतीला तेंदूपत्ता विकला जात आहे.
बिडीला अनेक पर्यायी उत्पादने बाजारात उपलब्ध
दहा वर्षांपूर्वी बिडीला चिलम व हुक्का हे दोनच पर्याय उपलब्ध होते. त्यातही ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक बिडी व चिलमचाच वापर करीत होते. त्यातही बिडीची मागणी अधिक होती मात्र आता बिडी व चिलमला पर्याय म्हणून सिगारेटसारखे उत्पादने बाजारात आली आहेत. आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी तयार केलेली सिगारेटसारखी उत्पादने तरूण पिढीला आकर्षीत करीत असल्याने तरूण पिढी बिडीच्या ऐवजी सिगारेटचा वापर अधिक करीत असल्याचे दिसून येते. बिडी पिणे हा कमीपणा वाटत असला तरी सिगारेट मात्र प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात असल्याने बिडीचा वापर कमी झाला आहे.
बिडीच्या किमतीतच स्वस्तात इतर उत्पादने मिळायला लागल्याने बिडीचा वापर कमी होत चालला आहे.
तेंदूपत्त्याच्या बाजारात कमालीची मंदी आल्याने काही कंत्राटदारांनी या व्यवसायाकडे पाठ फिरविली आहे. मागील वर्षी २२ कंत्राटदारांनी तेंदूपत्ता लिलावात भाग घेतला होता. यावर्षी मात्र केवळ सातच तेंदूपत्ता कंत्राटदार शिल्लक राहिले. त्यातही जिल्ह्यातील दोन व दुसºया जिल्ह्यातील पाच कंत्राटदारांचा समावेश आहे.