शासकीय खरेदी केंद्र बंद; शेतकऱ्यांची गोची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 11:38 PM2018-11-18T23:38:05+5:302018-11-18T23:39:40+5:30
राज्य सरकारने हमीभाव कापूस खरेदी केंद्र दिवाळी झाल्यानंतरही सुरू न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. व्यापाऱ्यांना कापूस विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल यंदा तेजीच्या कारणामुळे दिसून येत नाही. कापूस पणन महासंघ व सीसीआयच्या मदतीने राज्यात कापूस खरेदी केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्य सरकारने हमीभाव कापूस खरेदी केंद्र दिवाळी झाल्यानंतरही सुरू न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. व्यापाऱ्यांना कापूस विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल यंदा तेजीच्या कारणामुळे दिसून येत नाही. कापूस पणन महासंघ व सीसीआयच्या मदतीने राज्यात कापूस खरेदी केली जाणार आहे. वर्धा जिल्ह्यात एकही केंद्र अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस सध्या घरीच आहे. सोमवारी हे खरेदी केंद्र सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वर्धा जिल्ह्यात यंदा कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक भागात कापसावर बोंडअळी व मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. अनेक भागात एक ते दोन वेच्यानंतर कापूस पीक काढून टाकण्याची वेळ येण्याची चिन्ह आहेत. पूर्वीच पाऊस कमी झाल्याने कापसाच्या उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. एकरी पाच क्विंटल कापूसही शेतकºयांच्या हाती पडण्याची शक्यता नाही. जागतीक बाजारातही कापसाचे उत्पादन कमी होण्याची चिन्हे असल्याने कापसाचा भाव तेजीत राहिल, असे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्या ठिकठिकाणी खासगी जिनिंग प्रेसिंगमध्ये व्यापाºयांची कापूस खरेदी सुरू झाली आहे. काहींची खरेदी विजयादशमीला सुरू झाली. ५ हजार ९०० वर सुरू झालेला कापसाचा भाव आता ५ हजार ८०० ते ५ हजार ७०० पर्यंत आलेला आहे. मात्र, नगदी चुकारे शेतकऱ्यांना दिले जात नाहीत. काही ठिकाणी शेतकऱ्यांची कापूस गाडी खाली केल्यानंतर पुन्हा कमी भाव करून कापसाची खरेदी केली जात आहे. नगदी चुकारा हवा असेल तर ५ हजार ६०० रूपये भाव दिला जात आहे. सेलूच्या बाजारात सात जिनिंग प्रेसिंग कंपन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून खरेदी करीत आहे. आतापर्यंत १० हजार क्विंटल कापसाची खरेदी या भागात करण्यात आली. परंतु, कापसाचा भाव ५ हजार ८०० च्या पुढे सरकलेला नाही. शासकीय कापूस खरेदी सुरू झाल्याशिवाय व्यापाºयांवर दबाव येण्याची शक्यता नसल्याने कमी भावात कापूस खरेदी करण्यावर भर दिला जात आहे. सीसीआय व पणन महासंघाचे कापूस खरेदी केंद्र हिंगणघाट, सेलू, वर्धा आदी भागात सुरू झाल्यास कापसाच्या भावात तेजी येवू शकते, असे सांगण्यात येत आहे. यंदा कापसाचे उत्पादन पहिलेच घटले, त्यात कमी भाव कापसाला मिळत असल्याने शेतकरी पूरता हादरला आहे.
कापूस वेचणीचा खर्चही वाढतीवरच
यावर्षी मनानुसार (२० किलो) कापूस वेचणी करण्यात येत आहे. साधारणत: ७ ते ८ रूपये किलो दराने कापूस वेचनी करावी लागत आहे. महिला मजूरांची मोठी टंचाई या कामात दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांचा कापूस फुटून असला तरी वेचनीसाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे कापूस वेचनीचा भाव वाढतीवर आहे. त्या तुलनेत कापसाचा भाव कमी मिळत आहे.
शासनाने शासकीय खरेदी केंद्र अद्याप सुरू न केल्याने आम्हाला आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. शिवाय खासगी खरेदीदारांना अडचणीस्तव कापूस विकावा लागत आहे. यामुळे आमचे मोठे नुकसान होत आहे. कापूस खरेदी लवकर सुरू करावी.
- अतुल देशमुख, शेतकरी, तळेगाव (टा.).
रासायनिक खत, फवारणीचे औषध, मजुरी, मशागत आणि कापूस वेचनिस येणारा खर्च काढता मिळणारा निव्वळ नफा शेतीत सापडत नाही. तर आपले कुटुंब शेतीत राबत ती मजूरीच मिळते. त्यामुळे शेतीत कोणते पीक घ्यावे हेच कळेनासे झाले आहे.
- भास्कर गोमासे, शेतकरी, घोराड.
अस्मानी संकटाला गेल्या चार ते पाच वर्षांपासून तोंड द्यावे लागत आहे. त्यात मागील वर्षीप्रमाणे याही वर्षांत बोंडअळी व लाल्याचे संकट पुन्हा आमच्या पदरी पडले आहे. मात्र, निघालेला कापूस शासकीय खरेदी केंद्राअभावी घरात भरून आहे. शासकीय खरेदी सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
- सचिन अखुज, शेतकरी, सेलूकाटे.
यावर्षी बोंडअळीचा विशेष प्रादुर्भाव नसला तरी पाऊस कमी पडल्याने कापसाच्या उत्पादनात घट झाली. सध्या समाधानकारक दर मिळत आहे. शिवाय दर वाढीची अपेक्षा आहे.
-दिनकर काकडे, शेतकरी, आकोली.
मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षी चांगला भाव आहे; पण उत्पादन कमी आहे. कोरडवाहू शेतीत तर अत्यल्प उत्पादन होणार आहे. काही ठिकाणी उलंगवाडी झाली.
- संदिप अडसुळे, शेतकरी मसाळा.
कपाशी पिकाला चांगला दर मिळत नाही. तर या पिकाचा उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढतच आहे. वन्यप्राणी ही उभ्या पिकाचे नुकसान करतात. बोंडअळीमुळे सध्या उत्पादनात घट येत आहे. पुढील वर्षी कपाशीची लागवड करू की नाही हाच सध्या आपल्या समोरील प्रश्न आहे.
- सुरेश तेलरांधे, शेतकरी, घोराड.
कमी पाऊस झाल्याने विहिरीला पाणी नाही. कपाशीवर लाल्या आला आहे. त्यामुळे कापूस पिकण्याची काही हमी नाही. अर्ध्यावर उत्पन्न आले. सध्या मिळणारा बाजारभाव बरा असल्याने समाधान आहे.
- ॠषिकेश ढोङरे, शेतकरी, जामनी.
सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीची आक्रोश रॅली
वर्धा जिल्ह्यात कापूस उत्पादक संकटात सापडलेला आहे. अजूनपर्यंत शासनाने एकही कापूस खरेदी केंद्र सुरू केलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा हा आक्रोश शासनापूढे मांडण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात पोहणा ते हिंगणघाट अशी मोटरसायकल आक्रोश रॅली १९ नोव्हेंबरला काढण्यात येणार आहे. या रॅलीत राष्ट्रवादी कॉँग्रेससह समविचारी पक्ष सहभागी होण्याची माहिती हिंगणघाटचे माजी आमदार राजू तिमांडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.