गोरगरिबांच्या घरातील चुली पेटण्याची व्यवस्था करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 01:04 PM2020-03-23T13:04:53+5:302020-03-23T13:05:27+5:30
गोरगरीबांना महिनाभराचे धान्य आणि ५०० रुपये सानुग्रह मदत देऊन त्यांच्या घरात चूल पेटविण्याची व्यवस्था करणार, अशी माहिती राज्याचे मदत, पुनर्वसन व बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोलीत ‘लोकमत’शी बोलताना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोनाच्या राष्ट्रीय आपत्तीला तोंड देताना संपूर्ण व्यवहार ठप्प पडल्याने गोरगरीबांच्या घरातील चुली कशा पेटणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. पण सरकार म्हणून आम्ही आरोग्य सेवेसोबत गोरगरीबांना महिनाभराचे धान्य आणि ५०० रुपये सानुग्रह मदत देऊन त्यांच्या घरात चूल पेटविण्याची व्यवस्था करणार, अशी माहिती राज्याचे मदत, पुनर्वसन व बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोलीत ‘लोकमत’शी बोलताना दिली.
कोरोनाच्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक व्यवहारांवर आलेल्या निर्बंधामुळे मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागणार आहे. यात सर्वाधिक फटका गोरगरीबांना बसणार असून त्यांच्यापुढे जगण्याचा प्रश्न उभा ठाकणार आहे. अशा स्थितीत त्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांच्या घरातील चुली पेटण्यासाठी महिनाभराचे धान्य त्यांच्या घरपोच देण्याची व्यवस्था करू. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आणखी काय-काय मदत देता येईल याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे ना.वडेट्टीवार म्हणाले.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शासन-प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांना सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी सर्वांनी आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करून योग्य ती खबरदारी घेतल्यास या संकटावर मात करता येईल, असे ते म्हणाले.