गडचिरोलीतील समस्यांबाबत सरकारला धारेवर धरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:01 PM2017-11-17T23:01:57+5:302017-11-17T23:04:03+5:30
गडचिरोली जिल्हा दौऱ्यांवर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांची जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांची जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विविध समस्या आग्रहीपणे मांडल्या. विद्यमान सरकार शेतकरीविरोधी असून जिल्ह्यातील विकासकामांप्रती उदासीन आहे, असे सांगितले. यावर गडचिरोली जिल्ह्यातील समस्यांबाबत आगामी हिवाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार, अशी ग्वाही शरद पवार यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिली.
याप्रसंगी शरद पवार यांनी केंद्र व राज्यात स्थानिक पातळीवर धर्मांध जातीयवाद शक्तीला रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्रित येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. वास्तविक काँग्रेस-राकाँ हे मित्र पक्ष असून गडचिरोली जिल्हा परिषदेत या दोन्ही पक्षांची सदस्य संख्या मिळून सत्ता बसू शकत होती. मात्र राकाँच्या स्थानिक नेत्यांनी चुकीची माहिती दिली. यासंदर्भात लवकरच जिल्ह्यातील राकाँ पदाधिकाºयांना निर्देश देणार, असे पवार यांनी सांगितले. सूरजागड लोह प्रकल्पाबाबत माहिती देताना माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी सांगितले की, सरकार आदिवासींवर पोलिसांमार्फत दबाव टाकून प्रकल्पातील लोहखनीज कवडीमोल भावामध्ये इतरत्र नेत आहेत. यावर पवार यांनी शासनाने स्थानिक पातळीवर प्रकल्प उभारून रोजगार द्यावा, असे मत व्यक्त केले. कृषी महाविद्यालय इमारत, रखडलेले सिंचन प्रकल्प, शिष्यवृत्ती आदी समस्या त्यांना सांगण्यात आल्या. यावेळी महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रभाकर वासेकर, मनोहर पोरेटी हजर होते.