सरकारची पीक विमा योजना फसवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 01:45 AM2018-08-15T01:45:11+5:302018-08-15T01:46:41+5:30
जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे गतवर्षी विविध रोग, कीड व पावसाच्या अनियमितपणामुळे अर्धे पीक नष्ट झाले. शासनाला अहवालही प्राप्त झाला. मात्र संबंधित खासगी विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे गतवर्षी विविध रोग, कीड व पावसाच्या अनियमितपणामुळे अर्धे पीक नष्ट झाले. शासनाला अहवालही प्राप्त झाला. मात्र संबंधित खासगी विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे विद्यमान सरकारची पीक विमा योजना फसवी आहे, असा आरोप किसान सभेचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेश कोपुलवार यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
विद्यमान सरकारमधील सत्ताधारी नेत्यांनी अनेक घोषणा केल्या. मात्र एकही घोषणा पूर्णत्त्वास आणली नाही. दीडपट हमीभाव, रोजगार व इतर सर्व घोषणा फोल ठरल्या, असे डॉ. कोपुलवार म्हणाले.
महाराष्ट्र राज्य किसान सभा व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने २० आॅगस्ट रोजी राज्याचे वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर येथील कार्यालयावर शेतकरी, शेतमजूर व जबरानजोतधारकांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहितीही डॉ. कोपुलवार यांनी यावेळी दिली.
किसान सभेच्या वतीने देसाईगंज येथील सिंधी भवनात १८ व १९ आॅगस्टला राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेला भाकपाचे राज्यसचिव तुकाराम भस्मे, किसान सभेचे राज्य सचिव नामदेव गावडे, शिवकुमार गणवीर, नामदेव कन्नाके, जि. प. सदस्य लालसू नागोटी, अर्थ व कृषी अभ्यासक प्रा. डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अतुलकुमार अंजान उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. पत्रकार परिषदेला किसान महासभेचे जिल्हा सचिव देवराव चवळे, अॅड. जगदीश मेश्राम, हिरालाल येरमे, पुरूषोत्तम बांबोळे, हंसदास मेश्राम, प्रवीण मेश्राम हजर होते.