राज्यपाल भगतसिंग कोश्यारी गडचिरोलीत दाखल; डॉ.अभय बंग यांच्या 'सर्च' संस्थेला देणार भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 04:50 PM2021-10-11T16:50:09+5:302021-10-11T17:14:40+5:30
महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आज गडचिरोलीत दाखल झाले आहेत. ते गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासह विविध सामाजिक संस्थांना ते भेटी देणार आहेत. तसेच विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
गडचिरोली : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आज सोमवारी गडचिरोलीत दाखल झाले आहेत. ते गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासह विविध सामाजिक संस्थांना ते भेटी देणार आहेत. तसेच विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर -गडचिरोली जिल्हयाच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी आज सकाळी १०.३० वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर त्यांचा ताफा गडचिरोलीच्या दिशेने रवाना झाला. गोंडवाना विद्यापीठाचा नववा दीक्षांत समारंभ येत्या १२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल कोश्यारी यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्ष चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, आज राज्यपाल कोश्यारी हे चातगाव येथील डॉ.अभय बंग व राणी बंग यांच्या 'सर्च' संस्थेच्या शोधग्रामला भेट देणार आहेत. आदिवासी व ग्रामीण जनतेची आरोग्य सेवा, संशोधन तसेच दारू-तंबाखू मुक्तीसाठी केल्या जाणाऱ्या कार्याची माहिती ते जाणून घेतील. तसेच, डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंद यांची भेट घेऊन त्यांच्या उपक्रमांची माहिती घेतील. त्यासाठी शोधग्राममध्ये राज्यपालांच्या स्वागताची तयारी सुरू आहे.
उद्या मंगळवारी सकाळी एमआयडीसी परिसरात सीआरपीएफच्यावतीने आयोजित गुजरातपर्यंतच्या सायकल रॅलीचा राज्यपालांच्या हस्ते हिरवा झंडी दाखवून प्रारंभ केला जाणार आहे. यानंतर ते विद्यापीठाच्या नवव्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. गडचिरोली येथील कार्यक्रम आटपून ते नागपूरला पोहचणार आहेत. मंगळवारी दुपारी ३.३० ला ते विमानाने ते मुंबईकडे प्रयाण करतील.