हमीभाव रबी धान खरेदीसाठी शासनाचे वरातीमागून घाेडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2022 05:00 AM2022-06-01T05:00:00+5:302022-06-01T05:00:42+5:30
खरीप हंगामातील खरेदीची सुरुवात १ ऑक्टाेबर तर रब्बी हंगामातील धानाची खरेदी १ मेपासून हाेणे गरजेचे असते. दरवर्षी जीआरनुसार यात मागेपुढे हाेऊ शकते; परंतु हा कालावधी निश्चित असताे. यावर्षी १ मेपासून धानाची खरेदी सुरू हाेणार हाेती; परंतु केंद्र सुरू हाेण्यास दिरंगाई झाल्याने तसेच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार धान खरेदीचे जिल्ह्याचे उद्दिष्ट व प्रतीएकर धान खरेदीची मर्यादा याचा तिढा कायम हाेता. त्यामुळे ३१ जूनपर्यंत धान खरेदीची अवधी वाढविली आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : शासनाच्या आधारभूत धान खरेदी याेजनेंतर्गत रब्बी हंगामातील धानासाठी १ मे पासून हमीभाव खरेदी केंद्र सुरू हाेणे आवश्यक हाेते. परंतु यात बरीच दिरंगाई झाली. परिणामी मे महिन्यात ज्या शेतकऱ्यांचे धान पीक निघाले, अशा शेतकऱ्यांनी गरजेपाेटी लगेच धानाची विक्री खासगी व्यापाऱ्यांना केली. धान विक्री झाल्यानंतर आधारभूत खरेदी केंद्र सुरू झाल्याने ‘वरातीमागून घाेडे’ असाच काहीसा प्रकार शासनाचा झाला तर नाही ना, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.
गडचिराेली जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळांतर्गत हमीभाव खरेदी केंद्रांवर खरीप व रब्बी हंगामातील धानाची खरेदी केली जाते. खरीप हंगामातील खरेदीची सुरुवात १ ऑक्टाेबर तर रब्बी हंगामातील धानाची खरेदी १ मेपासून हाेणे गरजेचे असते. दरवर्षी जीआरनुसार यात मागेपुढे हाेऊ शकते; परंतु हा कालावधी निश्चित असताे.
यावर्षी १ मेपासून धानाची खरेदी सुरू हाेणार हाेती; परंतु केंद्र सुरू हाेण्यास दिरंगाई झाल्याने तसेच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार धान खरेदीचे जिल्ह्याचे उद्दिष्ट व प्रतीएकर धान खरेदीची मर्यादा याचा तिढा कायम हाेता. त्यामुळे ३१ जूनपर्यंत धान खरेदीची अवधी वाढविली आहे.
उतारा जास्त तरी मर्यादा कमी
रब्बीत लागवड केलेल्या धानाचे पीक उन्हाळ्यात कापणी व मळणीला येते. तीव्र प्रकाशामुळे पिकावर राेगांचा प्रादुर्भाव हाेत नाही. त्यामुळे खरीप हंगामापेक्षा उन्हाळी पिकाचा उतारा जास्त असतो. तरीही जिल्ह्याला यंदा एकरी केवळ ८.२४ क्विंटलची मर्यादा आहे. तर १.७५ लाख क्विंटलचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. एकरी मर्यादा व उद्दिष्ट अत्यल्प असून अनेक शेतकऱ्यांना आपल्याकडील धान खासगी व्यापाऱ्यांनाच विकल्याशिवाय पर्याय नाही.
पावसाळ्यात शेतकरी धान विकणार?
- जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात माेसमी वारे धडकणार, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. याच कालावधीत शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त राहणार आहेत. अशावेळी ते धानविक्रीसाठी हमीभाव केंद्रांवर जातील की, शेतीची कामे करतील, असा प्रश्न आहे. धान खरेदी केंद्रावर जाऊनही त्याच दिवशी काम हाेईल, याची शाश्वती नसते.
आविमची २८ केंद्रे
- आदिवासी विकास महामंडळांतर्गत गडचिराेली विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणारी एकूण २८ केंद्रे सध्या सुरू झाली आहेत. मात्र, येथे प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली नाही. शेतकरी धान विक्रीसाठी आणत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मार्केटिंग फेडरेशनचे केंद्र तर सुरूच झाले नाही.