ग्रा.पं. निवडणुकीच्या निकालाची उत्कंठा शिगेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:37 AM2021-01-19T04:37:43+5:302021-01-19T04:37:43+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क देसाईगंज : तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींमध्ये १५ जानेवारी राेजी मतदान पार पडले. निकाल लागण्यास आता पुन्हा चार ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींमध्ये १५ जानेवारी राेजी मतदान पार पडले. निकाल लागण्यास आता पुन्हा चार दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. सर्वांची मते ईव्हीएम मशीनमध्ये बंद असली तरी प्रत्येक उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते आपल्याला किती मते मिळाली, याचा अंदाज बांधत आहेत. तालुक्यातील कुरूड, काेंढाळा, शिवराजपूर, डाेंगरगाव, विहिरगाव, पाेटगाव, शंकरपूर, कसारी, चाेप, बाेडधा, एकलपूर, आमगाव, तुळशी, काेकडी, विसाेरा, किन्हाळा, माेहटाेला, पिंपळगाव या ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले. एकूण ३६ हजार ४९० मतदारांपैकी ३० हजार ३३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये १५ हजार ४७४ पुरुष तर १४ हजार ८६४ महिलांचा समावेश आहे. बहुतांश गावांमध्ये अत्यंत चुरशीच्या लढती झाल्याने निकालाबाबतच्या चर्चा गावात रंगत आहेत. काही पॅनलच्या उमेदवारांनी साम, दाम, दंड, भेद या सर्वांचा वापर केल्याचे दिसून येत आहे. विसाेरा, आमगाव, एकलपूर, चाेप, काेंढाळा, काेकडी या गावात राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिष्ठा पणाला लावून उमेदवारांचा प्रचार केला. अटीतटीच्या या लढतींमध्ये काेणाचे पारडे जड आहे, याचा अंदाज येणे कठीण हाेत आहे. निवडणुकीच्या चर्चांवरून ही निवडणूक अनेकांना धक्का देणारी ठरण्याची शक्यता आहे. उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांचेे निवडणूक निकालाकडे लक्ष लागले आहे.