ई लिलावातून ग्रा.पं. ला अधिक उत्पन्न शक्य
By admin | Published: October 8, 2016 01:59 AM2016-10-08T01:59:43+5:302016-10-08T01:59:43+5:30
तेंदू आणि बांबूमधून अधिक उत्पादन मिळवायचे असेल तर ग्रामपंचायतींनी ई लिलाव पद्धतीचा स्वीकार
गडचिरोली : तेंदू आणि बांबूमधून अधिक उत्पादन मिळवायचे असेल तर ग्रामपंचायतींनी ई लिलाव पद्धतीचा स्वीकार केला पाहिजे, याबाबत ग्रामपंचायतस्तरावर चर्चा घडविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी केले.
पेसा ग्रामपंचायमधील वनउपज व्यवस्थापन संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षात बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, सहाय्यक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोेफा, मोहन हिराबाई हिरालाल आदी उपस्थित होते.
पेसा अंतर्गत मागील हंगामात ग्रामपंचायतींना तेंदू आणि बांबू लिलावातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पादन मिळाले. मात्र हे लिलाव स्थानिकस्तरावर होत आहे. यात अधिक पारदर्शकता यावी आणि मोठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी ई टेंडरच्या माध्यमातून संपूर्ण देशातील खरेदीदारांना सहभागी करून घेता येणे शक्य आहे. स्पर्धा वाढल्यास ग्रामपंचायतीचे उत्पादन वाढेल. यासाठी जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींनी सहमती दर्शविली होती. या खरेदी-विक्री व्यवहारावर ग्रामपंचायतीचे पूर्ण नियंत्रण असावे, यासाठी ग्रामकोषातून पैसे काढताना तीन जणांच्या स्वाक्षरीची सक्ती करण्याची गरज आहे. याबाबत बँकांनाही अवगत करून देण्याची गरज असल्याचे नायक यावेळी म्हणाले.