भंगारात पडलेल्या ट्रॅक्टरवर तयार केले धान्य कापणी यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:43 AM2021-09-24T04:43:11+5:302021-09-24T04:43:11+5:30

जोगीसाखरा : सततच्या प्रयत्नाला आत्मविश्वास आणि कौशल्याची जोड दिली तर पुस्तकी अभ्यासातून मिळवलेल्या पदवीपेक्षाही जास्त ज्ञान प्राप्त करून ते ...

Grain harvester built on a wrecked tractor | भंगारात पडलेल्या ट्रॅक्टरवर तयार केले धान्य कापणी यंत्र

भंगारात पडलेल्या ट्रॅक्टरवर तयार केले धान्य कापणी यंत्र

Next

जोगीसाखरा : सततच्या प्रयत्नाला आत्मविश्वास आणि कौशल्याची जोड दिली तर पुस्तकी अभ्यासातून मिळवलेल्या पदवीपेक्षाही जास्त ज्ञान प्राप्त करून ते सिद्ध करता करता येते, याचा प्रत्यय शंकरनगर येथील एका तरुणाने दिला. गावाने वेड्यात काढलेल्या त्या अल्पशिक्षित तरुणाने जिद्द व मेहनतीच्या जोरावर भंगारात पडलेल्या एका जुन्या ट्रॅक्टरवर धान कापणी यंत्र तयार केले. त्याचा हा प्रयोग परिसरात कुतुहलाचा विषय होत आहे.

आरमोरी तालुक्यातील शंकरनगर या बंगाली गावातील ३० वर्षीय विश्वजित परिमल मंडल या युवकाचे जेमतेम नवव्या वर्गापर्यंतचे शिक्षण घेतले आहे. दारिद्र्याच्या परिस्थितीमुळे कोणाच्या शेतावर काम करून उदरनिर्वाह करणे एवढेच त्याचे काम. यात कधी डिझेल पंपाने पाणी देताना पंप बिघडला, तर त्याला खोलून दुरुस्त करणे एवढेच विश्वजितचे घेतलेले यांत्रिक ज्ञान. पण यांत्रिकी वस्तूंमध्ये असलेली आवड आणि जिज्ञासा यामुळे त्याने एक वेगळा प्रयोग केला. गोंदिया जिल्ह्यातील पुष्पनगर येथे पाच वर्षांपासून एकाच जागेवर असलेला नादुरुस्त जुना आयशर ट्रॅक्टर अवघ्या पंधरा हजार रुपयांत घेतला. त्या ट्रॅक्टरला स्वतःच्या बुद्धिकौशल्याने जागच्या जागीच खोलून दुरुस्त करून स्वत:च्या घरी आणले.

जुने ट्रॅक्टर घेणे, त्यात योग्य तो बदल करणे, विकणे अशा उचापत्यांमुळे गाववासीयांनी विश्वजितला वेड्यात काढले होते, पण आज त्याचे यांत्रिकी ज्ञान गावकरी स्वीकारत आहेत. मास्टर धान कापणी यंत्राचे मका पिकावर प्रात्यक्षिक करताना गावकरी तोंडात बोट घालतात. बेरोजगार तरुणांसाठी प्रेरणा ठरणारा विश्वजित गावासाठी आदर्श ठरत आहे. शेतीविषयक उपकरणे तयार करून परिवर्तनाचे स्वप्न पाहणाऱ्या विश्वजितला शासकीय यंत्रणेचे पाठबळ देणे गरजेचे आहे.

(बॉक्स)

मेकॅनिकची मदत न घेता केले बदल

विश्वजितच्या डोक्यात असलेेली कल्पना काय आहे हे कोणाला कळत नव्हते. त्यामुळे गावातील लोकांनी त्याला वेड्यात काढले पण त्याने आपली जिद्द सोडली नाही. बचत गटाकडून कर्ज घेऊन जुनी वापरलेली रिपर धान कापणी मशीन विकत घेतली. तिला ट्रॅक्टरच्या मागे लावून मागील वर्षी त्याने धान कापणीचे काम केले. एवढ्यावरच तो थांबला नाही तर बुद्धिकौशल्याचा वापर करत गिअर उलटे करून धान कापणी यंत्र ट्रॅक्टरच्या समोर लावले. त्या जुन्या ट्रॅक्टरचे सुरू करण्याचे हॅण्डल (चावी) समोर असते ते कोणत्याही मेकॅनिकची मदत न घेता मागे केले.

(बॉक्स)

कंपनीने दिलेली ऑफर नाकारली

शेतकऱ्यांच्या गरजेनुसार ट्रॅक्टरच्या रचनेत बदल करून मका मळणीचे पहिले यंत्र त्याने स्वतः तयार केले होते. शंकरनगर येथे मका मळणी यंत्र निर्माण झाल्यानंतर एका ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीने विश्वजितला कंपनीसाठी काम करण्याची ऑफर दिली होती, परंतु त्याने ती नाकारली. त्याने एक यशस्वी पाऊल पुढे टाकत सामान्य ट्रॅक्टरवर धान कापणी यंत्र तयार करून शेतकऱ्यांच्या यांत्रिकी शेतीत भर घातली. यामुळे मजुरांसाठी शेतकऱ्यांची होणारी तारांबळ थांबली.

Web Title: Grain harvester built on a wrecked tractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.