धान्याचा पुरवठा चार महिन्यांपासून बंद

By admin | Published: June 12, 2014 12:02 AM2014-06-12T00:02:05+5:302014-06-12T00:02:05+5:30

आरमोरी तालुक्यातील एपीएल कार्ड धारकांना मागील ४ महिन्यापासून सरकारी स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य बंद झाले असल्याने या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे.

The grain supply has been closed for four months | धान्याचा पुरवठा चार महिन्यांपासून बंद

धान्याचा पुरवठा चार महिन्यांपासून बंद

Next

ठाणेगाव : आरमोरी तालुक्यातील एपीएल कार्ड धारकांना मागील ४ महिन्यापासून सरकारी स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य बंद झाले असल्याने या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे.
केंद्र शासनाने अन्न सुरक्षा योजना लागू केली. या योजनेत बीपीएल कार्डधारकांसोबतच एपीएल कार्डधारकांनाही समाविष्ठ केले. काही नागरिकांनी राशन कार्डाचे नुतनीकरण करून कार्ड विभक्त केले. कार्ड विभक्त झाल्यानंतरही पिवळ्या कार्डधारकांना पिवळेच कार्ड देणे आवश्यक होते. मात्र विभक्त झाल्यानंतर त्यांना केशरी रंगाचे कार्ड देण्यात आले. त्यामुळे पिवळ्या कार्डामुळे होणाऱ्या लाभापासून या नागरिकांना वंचित राहावे लागले. बहुतांश कुटुंबांचा अन्न सुरक्षा योजनेतही समावेश झाला नाही. त्यामुळे या नागरिकांना १० रूपये तांदूळ व ७ रूपये किलो दराने गहु खरेदी करावे लागत आहे. खुल्या बाजारात अन्न धान्याचे भाव गगनाला भिडले असल्याने नागरिक सरकारी धान्य दुकानातूनच धान्य खरेदी करीत होते. मात्र अचानक एपीएल कार्डधारकांचा राशनचा पुरवठा मागील ४ महिन्यापासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे.
दिवसभर काबाळकष्ट करून १०० रूपये मजुरी कमाविणाऱ्या नागरिकाला ४० रूपये किलोचे तांदूळ व २५ रूपये किलोचे गहू खरेदी करणे शक्य होत नाही. खुल्या बाजारातून तांदूळ, गहू खरेदी करावयास गेल्यास त्याची दिवसाची मजुरीही पुरत नाही. अशा स्थितीत इतर खर्च कसा करावा असा प्रश्न निर्माण होत आहे.
उन्हाळ्यामध्ये शेतीची कामे बंद राहत असल्याने रोजगार मिळत नाही. त्यामुळे पैसाही जवळ राहत नाही. या आर्थिक विंवचनेत असतांना धान्य खरेदी करणे शक्य होत नाही. ठाणेगाव परिसरातील बहुसंख्य नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. शेतीसाठी आवश्यक असलेले बी-बियाणे व खते खरेदी करण्यासाठी जवळची गाठोडी खर्च करावी की त्यातून अन्न धान्य घ्यावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आणखी काही महिने धान्याचा पुरवठा न केल्यास अनेक कुटुंबावर उपाशी राहण्याची पाळी येणार आहे. त्यामुळे एपीएलधारकांनाही अन्नधान्याचा पुरवठा करण्यात यावा त्याचबरोबर ज्या गरीब नागरिकांना केशरी कार्ड देण्यात आले आहे. त्यांना पिवळे कार्ड देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: The grain supply has been closed for four months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.