उघड्यावरील धान्य सडले
By admin | Published: May 22, 2014 01:07 AM2014-05-22T01:07:17+5:302014-05-22T01:07:17+5:30
आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने अधीनस्त असलेल्या येथील सहकारी संस्थेमार्फत दरवर्षी करोडो रूपयाचे धान्य खरेदी केले जाते.
एटापल्ली : आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने अधीनस्त असलेल्या येथील सहकारी संस्थेमार्फत दरवर्षी करोडो रूपयाचे धान्य खरेदी केले जाते. मात्र महामंडळाकडे पुरेशी गोदामाची व्यवस्था नसल्यामुळे खरेदी केलेले धान्य उघड्यावरच ठेवल्या जाते. अवकाळी पावसाचा या धान्याला फटका बसला असून या धान्यामुळे दुर्गंधी पसरून आरोग्य धोक्यात आले आहे. एटापल्ली येथे संस्थेने खरेदी केलेले धान्य उघड्यावर ठेवण्यात आले असून सदर धान्य सडले आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या अधीनस्त येथील सहकारी संस्थेने दोन वर्षापूर्वी लाखो रूपयांचे धान्य खरेदी केले. सदर धान्य उघड्यावर ठेवण्यात आले. बराच कालावधी लोटून गेल्यानंतरही उघड्यावरील धान्याची उचल करण्यात आली नाही. या धान्यावर मोकाट जनावरे व डुकरांचा नेहमी हैदोस असतो. सडलेल्या धान्याची दुर्गंधी परिसरात पसरत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिक त्रस्त झाले आहेत. उघड्यावरील सडलेल्या धान्याची आठ दिवसात उचल न केल्यास आदिवासी विकास महामंडळ प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील व्यावसायिक संघटनेने दिला आहे. या इशार्याची दखल घेऊन उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार यु. जी. वैद्य यांनी उघड्यावरील धान्याची पाहणी केली. सडलेले उघड्यावरील धान्य महामंडळाच्या अहेरी उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत ८ दिवसाच्या आत उचलण्याच्या सूचना उपविभागीय अधिकार्यांनी तहसीलदारांना दिले. ८ दिवसात धान्याची उचल न केल्यास संबंधिताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही पाटील यांनी दिले आहे. सडलेल्या धान्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार यापूर्वी उपविभागीय अधिकार्यांकडे देण्यात आली होती. सडलेल्या धान्याची अशाप्रकारची अवस्था बहुतांश केंद्रावर आहे. यामुळे नव्या गोदाम व्यवस्थेची मागणी नागरिकांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)