एप्रिलमध्ये विकलेल्या धानाला बोनस मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 05:47 PM2020-09-26T17:47:37+5:302020-09-26T17:47:57+5:30
शासनाने ३० एप्रिलपर्यंत धान खरेदीला मुदतवाढ दिली. या कालावधीतील धान खरेदीच्या बोनसचा प्रश्न शासनाने मार्गी लावला आहे. एप्रिल महिन्यात धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना ५० क्विंटलच्या मर्यादेत प्रती क्विंटल ७०० रुपये प्रमाणे बोनस मिळणार आहे.
दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोना लॉकडाऊनमुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आदिवासी विकास महामंडळांतर्गत खरीप हंगामातील आधारभूत केंद्रावरील धानाची खरेदी बंद पडली. शासनाने ३० एप्रिलपर्यंत धान खरेदीला मुदतवाढ दिली. या कालावधीतील धान खरेदीच्या बोनसचा प्रश्न शासनाने मार्गी लावला आहे. एप्रिल महिन्यात धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना ५० क्विंटलच्या मर्यादेत प्रती क्विंटल ७०० रुपये प्रमाणे बोनस मिळणार आहे.
एप्रिल महिन्यात धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबत राज्य शासनाने ४ सप्टेंबर २०२० रोजी निर्णय घेतला. त्या अनुषंगाने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने शासन निर्णय निर्गमित केला. या शासन निर्णयानुसार, खरीप हंगाम २०१९-२० मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२० या वाढीव कालावधीत खरेदी केलेल्या धानाला प्रती क्विंटल ५०० रुपये प्रोत्साहनपर व या व्यतिरिक्त २०० रुपये असे एकूण ७०० रुपयांचा बोनस मंजूर करण्यात आला आहे.
आदिवासी विकास महामंडळांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाच्या हद्दित खरीप हंगामात एप्रिल महिन्यात वाढीव कालावधीमध्ये एकूण ५४ केंद्रांवरून धानाची खरेदी करण्यात आली. एकूण ४ कोटी ९८ लाख रुपये किमतीच्या २७ हजार ४३८ क्विंटल इतकी धानाची खरेदी करण्यात आली. एप्रिल महिन्यात गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत असलेल्या केंद्रांवर एकूण २ हजार २९० शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली. या धानाचे चुकारे शेतकऱ्यांना अदा करण्यात आले असून बोनस अदा करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. आविका संस्थांकडून आलेल्या हुंड्यांची पडताळणी करून व संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यांची तपासणी करून बोनसची रक्कम लवकरच वळती करण्यात येणार आहे, अशी माहिती महामंडळाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे शासनाने धान खरेदीला एक महिन्याची मुदतवाढ दिली होती.
दोन हजारवर शेतकºयांना मिळणार लाभ
शासनाने दिलेल्या मुदतवाढीनंतर एप्रिल महिन्यात आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत महामंडळाच्या वतीने आविका संस्थांमार्फत गडचिरोली व अहेरी कार्यालय मिळून जवळपास ६० केंद्रांवरून एकूण ३२ हजार ४३८ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. जवळपास अडीच हजार शेतकऱ्यांच्या धानाचा काटा एप्रिल महिन्यात करण्यात आला. ५० हजार क्विंटलच्या मर्यादेत प्रती क्विंटल ७०० रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना बोनसचा लाभ मिळणार आहे. जवळपास २ हजार शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात विक्री केलेल्या धानाला बोनस निश्चित नसल्यामुळे ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणाप्रती मोठी ओरड केली होती. मात्र शासनाने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय दिला आहे.
अहेरीत पाच हजार क्विंटलची खरेदी
आदिवासी विकास महामंडळाचा धान खरेदीचा खरीप हंगाम १ ऑक्टोबर ते ३१ मार्च असा असतो. कोरोना लॉकडाऊनमुळे काही शेतकऱ्यांच्या धानाचा काटा शिल्लक होता. मुदतवाढीनंतर अहेरी कार्यालयाच्या हद्दित पाच हजार क्विंटलची धान खरेदी करण्यात आली, अशी माहिती अहेरीचे उपप्रादेशिक व्यवस्थापक आशिष मुळेवार यांनी दिली.