राज्यात कोरोनामुळे रखडललेल्या ग्रामपंचायत निवडणुका होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 06:37 PM2020-09-18T18:37:47+5:302020-09-18T18:55:29+5:30

राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये कोरोनामुळे रखडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया आता पूर्ण करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने परिस्थितीची चाचपणी सुरू केली आहे.

Gram panchayat elections in state | राज्यात कोरोनामुळे रखडललेल्या ग्रामपंचायत निवडणुका होणार

राज्यात कोरोनामुळे रखडललेल्या ग्रामपंचायत निवडणुका होणार

Next
ठळक मुद्देनिवडणूक आयोगाकडून चाचपणी१९ जिल्ह्यात मुदत संपली

मनोज ताजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये कोरोनामुळे रखडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया आता पूर्ण करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने परिस्थितीची चाचपणी सुरू केली आहे. ज्या गावांमधील निवडणूक प्रक्रिया थांबली आहे त्या गावांमध्ये कोरोनाची काय स्थिती आहे याची विचारणा निवडणूक आयोगाने संबंधित जिल्ह्यांकडे केली आहे.
एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित १५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम फेब्रुवारी महिन्यातच जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार प्रक्रियाही सुरू झाली होती. १७ मार्च रोजी उमेदवारांच्या अर्जांची छाननी होत असताना सदर प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत आहे त्या स्थितीत ठेवण्याचा आदेश धडकला. दरम्यान कोरोना लवकर आटोक्यात येणार नाही हे लक्षात आल्याने निवडणुकीची आचारसंहिता हटवून संबंधित ग्रामपंचायतींवर प्रशासकांचीही नियुक्ती करण्यात आली.

आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्देश मिळाल्याने सद्यस्थितीचा अंदाज घेऊन रखडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका घेण्याचे विचाराधीन असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने संबंधित सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे.
आता कोणत्या ग्रामपंचायतींच्या हद्दीत कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आहे, कुठे मतदान घेणे शक्य आहे याबाबतचा विस्तृत अहवाल २१ सप्टेंबरपर्यंत सादर करण्याची सूचना निवडणूक आयोगाने केली आहे.

या जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींचा समावेश
ग्रामपंचायतींमधील निवडणूक प्रक्रिया अर्धवट स्थितीत थांबलेल्या जिल्ह्यांमध्ये राज्यभरातील १९ जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यात विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, नागपूर, वर्धा व गडचिरोली तसेच बाकी भागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे.

Web Title: Gram panchayat elections in state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.