ग्रामपंचायत निवडणुकीत जि.प. पदाधिकाऱ्यांचा लागणार कस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 05:00 AM2020-12-30T05:00:00+5:302020-12-30T05:00:21+5:30
जि.प.पदाधिकाऱ्यांमध्ये शिवसेना वगळता सर्वच प्रमुख पक्षांच्या सदस्यांचा समावेश आहे. हे पक्ष आपापल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी सरसावले आहेत. जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार आदिवासी विद्यार्थी संघाचे आधारस्तंभ आहेत. पण वर्षभरापासून त्यांची काँग्रेस पक्षाशी जवळीकता वाढली. त्यामुळे दक्षिण भागात त्यांच्या रुपाने काँग्रेसला मजबूत सहकारी मिळाला आहे. याच भागात आ.धर्मरावबाबा यांनी वर्षभरापूर्वी बाजी मारल्याने राष्ट्रवादीची फळीही आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : येत्या १५ आणि २० जानेवारी अशा दोन टप्प्यात होऊ घातलेल्या ३६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. ग्रामपंचायतींशी सर्वाधिक जवळचा संबंध असणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा यामुळे पणाला लागली आहे. आपापल्या क्षेत्रातील ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व ठेवण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.
जि.प.पदाधिकाऱ्यांमध्ये शिवसेना वगळता सर्वच प्रमुख पक्षांच्या सदस्यांचा समावेश आहे. हे पक्ष आपापल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी सरसावले आहेत. जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार आदिवासी विद्यार्थी संघाचे आधारस्तंभ आहेत. पण वर्षभरापासून त्यांची काँग्रेस पक्षाशी जवळीकता वाढली. त्यामुळे दक्षिण भागात त्यांच्या रुपाने काँग्रेसला मजबूत सहकारी मिळाला आहे. याच भागात आ.धर्मरावबाबा यांनी वर्षभरापूर्वी बाजी मारल्याने राष्ट्रवादीची फळीही आहे. गडचिरोली आणि आरमोरी विधानसभा क्षेत्रात भाजपचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आमदार अभिजीत वंजारी यांना घेऊन जिल्हा पिंजून काढत आहे.
जि.प.अध्यक्षांचा आलापल्ली-वेलगूर गट
अहेरी तालुक्यातील आलापल्ली-वेलगूर या जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या जि.प.गटात आलापल्ली, वेलगूर आणि किष्टापूर (वेल) या तीन ग्रामपंचायती आहेत. त्यात आविसं-काँग्रेसला फाईट देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नात आहेत. पण या दोन प्रतिस्पर्ध्यांपुढे आता ग्रामसभा आपले उमेदवार उभे करून नवे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
समाजकल्याण सभापतींचा रेगडी गट
जि.प.च्या समाजकल्याण सभापती रंजिता कोडाप यांच्या गटात १० ग्रामपंचायती आहेत. या भागाने भाजपला बरीच साथ दिली आहे. यावेळी काँग्रेसनेही बऱ्यापैकी कंबर कसून कार्यकर्त्यांची फळी तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कोणता पक्ष जास्त प्रभाव पाडतो याकडे मतदारांचे लक्ष राहणार आहे.
उपाध्यक्षांच्या मुस्का गटात भाजपचे आव्हान
धानोरा तालुक्यातील मुस्का या जि.प.चे गटाचे प्रतिनिधीत्व करत असलेले काँग्रेस नेते मनोहर पोरेटी यांच्या मतदार संघात तब्बल १६ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी १५ मध्ये निवडणूक होत आहे. त्यामुळे त्यांचा चांगलाच कस लागणार आहे. जनसंपर्कामुळे त्यांना मानणारा वर्ग त्या भागात असला तरी भाजप त्या गावांमध्ये आव्हान उभे करू शकतो.
कृषी सभापती आपली पकड कायम ठेवणार?
चामोर्शी तालुक्यातील तळोधी-कुनघाडा या गटात भाजपचे सभापती प्रा.रमेश बारसागडे यांची बऱ्यापैकी पकड आहे. त्यांच्या गटातील ७ पैकी ६ ग्रामपंचायतमध्ये निवडणूक होत आहे. त्यातील कुनघाडा, तळोधी, नवेगाव (रै), भाडभिडी, हिवरगाव या गावांमध्ये काँग्रेसही वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्नशिल आहे.
महिला बालकल्याण सभापतींचा कुरूड गट
देसाईगंज तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कुरूडसह एकूण ६ ग्रामपंचायतींचा हा मतदार संघ सभापती रोशनी पारधी यांच्यासह सर्व राजकीय पक्षांसाठी महत्वपूर्ण मानला जातो. या भागात गेल्या काही वर्षात भाजपचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणणे त्यांच्यासाठी खूप कठीण वाटत नसले तरी काँग्रेसच्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे.