ग्रामपंचायत निवडणुकीत जि.प. पदाधिकाऱ्यांचा लागणार कस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:45 AM2020-12-30T04:45:52+5:302020-12-30T04:45:52+5:30
जि.प.अध्यक्षांचा आलापल्ली-वेलगूर गट अहेरी तालुक्यातील आलापल्ली-वेलगूर या जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या जि.प.गटात आलापल्ली, वेलगूर आणि किष्टापूर (वेल) ...
जि.प.अध्यक्षांचा आलापल्ली-वेलगूर गट
अहेरी तालुक्यातील आलापल्ली-वेलगूर या जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या जि.प.गटात आलापल्ली, वेलगूर आणि किष्टापूर (वेल) या तीन ग्रामपंचायती आहेत. त्यात आविसं-काँग्रेसला फाईट देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नात आहेत. पण या दोन प्रतिस्पर्ध्यांपुढे आता ग्रामसभा आपले उमेदवार उभे करून नवे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. अर्थात त्यांना यश मिळण्याची शक्यता कमीच आहे.
उपाध्यक्षांच्या मुस्का गटात भाजपचे आव्हान
धानोरा तालुक्यातील मुस्का या जि.प.चे गटाचे प्रतिनिधीत्व करत असलेले काँग्रेस नेते मनोहर पोरेटी यांच्या मतदार संघात तब्बल १६ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी १५ मध्ये निवडणूक होत आहे. त्यामुळे त्यांचा चांगलाच कस लागणार आहे. जनसंपर्क आणि मृदू स्वभावामुळे त्यांना मानणारा वर्ग त्या भागात असला तरी भाजप त्या गावांमध्ये आव्हान उभे करू शकतो.
महिला बालकल्याण सभापतींचा कुरूड कोकडी गट
देसाईगंज तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कुरूडसह एकूण ६ ग्रामपंचायतींचा हा मतदार संघ सभापती रोशनी पारधी यांच्यासह सर्व राजकीय पक्षांसाठी महत्वपूर्ण मानला जातो. या भागात गेल्या काही वर्षात भाजपचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणणे त्यांच्यासाठी खूप कठीण वाटत नसले तरी काँग्रेसच्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे.
कृषी सभापती आपली पकड कायम ठेवणार?
चामोर्शी तालुक्यातील तळोधी-कुनघाडा या गटात भाजपचे सभापती प्रा.रमेश बारसागडे यांची बऱ्यापैकी पकड आहे. त्यांच्या गटातील ७ पैकी ६ ग्रामपंचायतमध्ये निवडणूक होत आहे. त्यातील कुनघाडा, तळोधी, नवेगाव (रै), भाडभिडी, हिवरगाव या गावांमध्ये काँग्रेसही वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्नशिल आहे. त्यामुळे कृषी सभापतींची पकड कायम राहणार का, अशी चर्चा सुरू आहे.
समाजकल्याण सभापतींचा रेगडी हळदवाही गट
जि.प.च्या समाजकल्याण सभापती रंजिता कोडाप यांच्या गटात १० ग्रामपंचायती आहेत. या भागाने भाजपला बरीच साथ दिली आहे. यावेळी काँग्रेसनेही बऱ्यापैकी कंबर कसून कार्यकर्त्यांची फळी तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कोणता पक्ष जास्त प्रभाव पाडतो याकडे मतदारांचे लक्ष राहणार आहे.