शाळांची घंटा वाजणार ग्रामपंचायत, पालकांच्या ‘एनओसी’नंतरच...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:41 AM2021-07-14T04:41:47+5:302021-07-14T04:41:47+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : संपूर्ण एक वर्ष व परीक्षेच्या कालावधीत काेराेना संसर्गामुळे शाळांचे वर्ग प्रत्यक्ष भरणे बंद आहे. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : संपूर्ण एक वर्ष व परीक्षेच्या कालावधीत काेराेना संसर्गामुळे शाळांचे वर्ग प्रत्यक्ष भरणे बंद आहे. परिणामी ऑनलाइन शिक्षण फारसे प्रभावी नाही. ऑनलाईन शिक्षणाला पालक, विद्यार्थी व शिक्षकही कंटाळले आहेत. दरम्यान, शाळांचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी सर्व घटक तयार आहेत. मात्र, हे वर्ग सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती व पालकांची सहमती आवश्यक आहे. त्यानंतरच वर्ग प्रत्यक्ष भरवून त्याची नाेंद हाेणार आहे.
गडचिराेली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १ हजार ४६४ शाळा आहेत. खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित २०४ तसेच विनाअनुदानित १८ शाळा आहेत. याशिवाय जिल्हाभरात ४४ शासकीय आश्रमशाळा आहेत. ५० च्या जवळपास अनुदानित आश्रमशाळा आहेत. काेराेना संसर्गामुळे या सर्व शाळांचे प्रत्यक्ष वर्ग बंद पडले आहेत. २८ जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू झाले. विद्यार्थ्याविना शाळा सुरू झाल्या. विद्यार्थी नसल्याने शिक्षकही कंटाळले आहेत.
टप्प्याटप्प्याने शाळांचे वर्ग सुरू करण्याच्या हालचाली शासन व प्रशासनस्तरावर सुरू झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात आठवी ते बारावी व दुसऱ्या टप्प्यात पाचवी ते आठवी व तिसऱ्या टप्प्यात पहिली ते चौथीचे वर्ग सुरू हाेण्याची शक्यता आहे. यासाठी बैठकांमध्ये मंथन हाेत आहे.
बाॅक्स...
आतापर्यंत १२ गावांची सहमती
गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता पहिली ते चाैथी, पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्यात यावे, अशी मागणी करून जिल्ह्यातील १२ गावांनी सहमती दर्शविली आहे. शाळास्तरावर प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. शाळा व्यवस्थापन समिती व पालकांच्या सहमतीने शाळांचे वर्ग सुरू करण्यास प्रशासनाला अडचण नाही.
काेट...
गेल्या वर्षभरापासून माझा मुलगा व मुलगी घरी राहून माेबाईलच्या सहाय्याने ऑनलाइन शिक्षण घेत आहे. मात्र, नेटवर्कचा अभाव, जुन्या स्मार्ट फाेनमुळे शिक्षण याेग्य हाेत नाही. प्रत्यक्ष शिक्षण व ऑनलाईन शिक्षणात बराच फरक आहे. आम्ही ग्रामीण भागात राहत असल्याने आमची मुले शिक्षणात मागे पडत आहेत. त्यामुळे शासन व प्रशासनाने प्रत्यक्ष वर्ग भरवावेत.
- कुंदा मारबते
............
माझ्या दाेन्ही मुली काॅन्व्हेंटमध्ये शिकतात. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून त्यांनी शाळेचे दर्शन घेतले नाही. स्मार्टफाेनद्वारे शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, सर्व विषय व त्यातील संकल्पना स्पष्ट समजत नाही. इंटरनेटची गती कमी राहत असल्याने झूम ॲपवरील ऑनलाईन वर्गात अडचणी येतात. त्यामुळे प्रत्यक्ष वर्ग सुरू करावेे, अशी आग्रही मागणी आहे.
- सुनील डाेंगरे
............
१५ जुलै इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, त्याखालील वर्ग व सर्व शाळा सुरू करण्याबाबत शिक्षक, पालकांसह शाळा व्यवस्थापन समित्या व ग्रामपंचायत पदाधिकारी तयार आहेत. पालकांचे सहमतीपत्र व त्या गावांचे ठराव प्राप्त झाल्यावर जि.प.च्या वतीने त्यांना वर्ग भरविण्यासाठी परवानगी देण्यात येईल. कमी पटसंख्येच्या काेरची तालुक्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकवत आहेत. जि.प.च्या शिक्षण समितीची बैठक आज साेमवारला पार पडली. या बैठकीत शाळांचे सर्व वर्ग भरविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
- हेमलता परसा, प्राथमिक शिक्षणाधिकारी, गडचिराेली
बाॅक्स...
काेराेनामुक्त ८५ टक्के गावात अडचण नाही
- गडचिराेली जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागातील मिळून एकूण १ हजार ६८१ गावे आहेत.
- आतापर्यंत १ हजार १५० पेक्षा अधिक गावे काेराेनामुक्त झाली आहेत.
- जिल्ह्यातील ८५ टक्के गावांमध्ये आता काेराेनाचा संसर्ग नाही. त्यामुळे या गावांमधील शाळा प्रत्यक्ष भरविण्यासाठी काेणत्याही अडचणी नाहीत.
- शहरी भागातील १५ टक्के गावांमध्ये काेराेना संसर्ग आहे.