मल्लमपोड्डूर येथे ‘ग्राम पंचायत आपल्या दारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 01:01 AM2018-09-01T01:01:52+5:302018-09-01T01:02:42+5:30
तालुक्यातील बहुतांश गावे नक्षलग्रस्त व जंगलव्याप्त भागात आहेत. या गावांमध्ये शासकीय योजना पोहोचत नाही. तसेच सोयीसुविधांचाही लाभ नागरिकांना मिळत नाही. ही समस्या जाणून ग्राम पंचायत मल्लमपोड्डूच्या वतीने ग्राम पंचायत आपल्या दारी हा उपक्रम सुरू करून नागरिकांना शासकीय योजनांसह सोयीसुविधांची माहिती दिली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : तालुक्यातील बहुतांश गावे नक्षलग्रस्त व जंगलव्याप्त भागात आहेत. या गावांमध्ये शासकीय योजना पोहोचत नाही. तसेच सोयीसुविधांचाही लाभ नागरिकांना मिळत नाही. ही समस्या जाणून ग्राम पंचायत मल्लमपोड्डूच्या वतीने ग्राम पंचायत आपल्या दारी हा उपक्रम सुरू करून नागरिकांना शासकीय योजनांसह सोयीसुविधांची माहिती दिली जात आहे.
हिंदेवाडा टोला या गावापासून सदर उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम गावातील प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन त्यांची सर्वसाधारण माहिती घेण्यात आली.
यामध्ये कुटुंबात एकूण किती सदस्य आहेत, त्यांचे शिक्षण, किती जणांकडे आधार कार्ड आहे, बँक खाते आहे, कुटुंबात अपंग व्यक्ती आहेत का, असतील तर अपंग प्रमाणपत्र आहे का, कुटुंबाकडे रेशन कार्ड, जॉब कार्ड आहे का, जातीचे प्रमाणपत्र, विद्युत मीटर गॅस सिलिंडर, शौचालय आहे काय, शौचालयाचा वापर होत सुरू आहे की नाही, यासह कुटुंबास शेती, आरोग्याबाबत माहिती देऊन वयोवृद्ध, नागरिक व निराधारांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. योजनाचा लाभ घेताना अडचणी येऊ नये, यावरही मार्गदर्शन केले जात आहे.
या उपक्रमात सरपंच अरुणा संजय वेलादी, सचिव अविनाश गोरे, आशा वर्कर छाया वेलादी, रोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी साईनाथ गव्हारे सहभागी झाल्या होत्या. ग्राम पंचायतीच्या वतीने राबविल्या जाणाºया या उपक्रमाचे तालुक्यात कौतुक केले जात आहे.