ग्रामसभा करणार ‘कुर्मा’त सुधारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 10:45 PM2018-03-08T22:45:55+5:302018-03-08T22:45:55+5:30
आदिवासी महिलांच्या आरोग्यविषयक अनेक समस्या आहेत. पण त्याकडे गांभिर्याने लक्ष दिल्या जात नाही. परंपरागतरित्या प्रत्येक गावागावात पाळली जात असलेली ‘कुर्मा’ पद्धत चांगली किंवा वाईट या वादात न पडता ती पद्धत पाळताना महिलांना होणारा त्रास कमी करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : आदिवासी महिलांच्या आरोग्यविषयक अनेक समस्या आहेत. पण त्याकडे गांभिर्याने लक्ष दिल्या जात नाही. परंपरागतरित्या प्रत्येक गावागावात पाळली जात असलेली ‘कुर्मा’ पद्धत चांगली किंवा वाईट या वादात न पडता ती पद्धत पाळताना महिलांना होणारा त्रास कमी करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी गावागावात सुसज्ज ‘कुरमा घर’ तयार करण्यासाठी आणि त्यात विविध सुविधा देण्यासाठी ग्रामसभेच्या वतीने पुढाकार घेतला जाईल, असा निर्धार कोदावाही ग्रामसभेचे अध्यक्ष देवाजी पदा व इतर मान्यवरांनी व्यक्त केला.
महिला दिनानिमित्त गुरूवारी धानोरा तालुक्यातील घोडेझरी या गावात परिसरातील ४० गाव आणि टोल्यांमधील महिलांचा मेळावा घेण्यात आला. अशा प्रकारे प्रथमच गावात महिला मेळावा झाल्याने मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी मंचावर पदा यांच्यासह खुटगाव ईलाख्याचे माजी प्रमुख ईस्तरी परसे, पेनवो कारू परसे, ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या धानोरा तालुका समन्वयिका मंदा तोफा, सामाजिक कार्यकर्त्या देवला भास्कर कड्यामी, गोडलवाही पोलीस मदत केदं्राचे प्रभारी अधिकारी गोटे, गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारवाफा शाखेचे व्यवस्थापक अनिल श्रीरामे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी देवाजी पदा म्हणाले, अनेक दिवसांपासून महिला मेळावा घेण्याची इच्छा होती. पण आज महिला दिनाच्या निमित्ताने तो योग आला. या निमित्ताने आदिवासी महिलांच्या समस्यांचा उहापोह करता आला. पेसा कायद्यामुळे मिळालेल्या अधिकारातून आता ग्रामसभांना तेंदूपत्ता व बांबू लिलावातून बºयापैकी उत्पन्न होते. त्या उत्पन्नाचा उपयोग सर्व ग्रामसभांनी गावाच्या विकासासाठी आणि सोयीसुविधांसाठी करावा असे आवाहन त्यांनी केले. पोलीस मदत केंद्राचे प्रभारी गोटे यांनी महिलांनी शिक्षणावर अधिक जोर देऊन जास्तीत जास्त शिक्षण घ्यावे. त्यातूनच प्रगती साधणे शक्य होईल असे सांगितले.
मंदा तोफा यांनी महिलांना मासिक पाळीदरम्यान पाळाव्या लागणाºया कुर्मा पद्धतीमधील वाईट गोष्टी दूर करून चांगल्या गोष्टी ठेवा, असे सांगितले. पाळीदरम्यान ज्या वेगळ्या घरात त्या महिलेला राहावे लागते त्या कुरमा घरांची दुरवस्था आणि त्यामुळे महिलांना असलेली साप, विंचवांची भिती राहणार नाही अशी व्यवस्था ग्रामसभांनी करणे गरजेचे असल्याचे सांगितले. याशिवाय बचत गटांच्या माध्यमातून विविध व्यवसाय करून प्रगती साधण्याचा सल्ला दिला. अनिल श्रीरामे यांनी बँकेच्या विविध योजनांची माहिती देऊन महिलांची बचत व प्रगतीसाठी बँकेचा कसा उपयोग होतो हे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन करताना देवला कड्यामी यांनी महिला मेळाव्याच्या आयोजनामागील उद्देश सांगितला. आदिवासी महिलांना कुटुंबात व समाजात सन्मान मिळावा, महिलांनी ग्रामसभेत सहभाग घ्यावा, गावातील विकासाच्या कामांचे नियोजन करण्यात पुढाकार घ्यावा, स्वत:चे व कुटुंबाचे आरोग्य सुधारण्यासाठी पुढाकार घ्यावा. आदिवासी संस्कृती, परंपरा जतन करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे उद्देश असल्याचे त्या म्हणाल्या.
सुरूवातीला युवक-युवतींनी आकर्षक आदिवासी नृत्य सादर केले. तसेच कुपानीर, घोडेझरी व गोदलवाही या तीन गावांमधील महिलांच्या व्हॉलिबॉल चमूंना रोख स्वरूपात बक्षिसांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमासाठी गावातील युवकांनी मेहनत घेतली.