ग्रामसभेतर्फे दारू व खर्राबंदीचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 01:18 AM2018-09-23T01:18:22+5:302018-09-23T01:18:58+5:30
पाऊस सुरू असतानाही पावसाची पर्वा न करता इरुपटोला, मुरुमाडी, मंगेवाडा या तिन्ही गावचे लोक मुरुमाडी गावात ग्रामसभेसाठी एकत्र जमले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : पाऊस सुरू असतानाही पावसाची पर्वा न करता इरुपटोला, मुरुमाडी, मंगेवाडा या तिन्ही गावचे लोक मुरुमाडी गावात ग्रामसभेसाठी एकत्र जमले होते. ही ग्रामसभा घरकुल किंवा शेळ्या मेंढ्या वाटपाची नव्हे, तर दारु व खर्रा बंदीची ग्रामसभा असूनही येथे ३०० ग्रामस्थ उपस्थित होते हे विशेष. इरुपटोला ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या ग्रामसभेमध्ये २१ सप्टेंबर रोजी दारू व खर्रा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. महिला बचत गट व मुक्तिपथ गाव संघटना यांच्या पुढाकारातून या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सभेला जिल्हा परिषद सदस्य लता पुंगाटी, मालेवाडा पोलीस मदत केंद्राचे पोलीस निरीक्षक आर. के. जाधव, मुक्तिपथचे उपसंचालक संतोष सावळकर, धानोरा तालुका संघटक सागर गोतपागर, संघमित्रा ढवळे, संदीप नरोटे व तिन्ही गावातील पोलीस पाटील, सरपंच उपस्थित होते. यावेळी गटग्रामपंचायतीच्या तिन्ही गावात दारू व खर्रा विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. विक्री सोबतच दारू पिऊन, खर्रा खाऊन सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालणाऱ्यांनाही शिक्षा होणार असल्याचे घोषित करण्यात आले. गावांमध्ये कोणीही खर्रा किंवा दारू विक्री करताना आढळल्यास त्यांना पहिल्या वेळी पाच हजार रुपये दंड, तर दुसºयांदा दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. तिन्ही गावातील गाव संघटना या नियमांची अंमलबजावणी व पाठपुरावा करतील व गावात लक्ष ठेवतील, असे ग्रामसभेत ठरविण्यात आले. पोलीस विभागातर्फे आवश्क ती मदत केली जाईल, अशी ग्वाही उपस्थित पोलीस निरीक्षक जाधव यांनी दिली. यावेळी इरुपटोला येथील जिजामाता हायस्कूल व मुरुमाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुले उपस्थित होते. त्यांनी गावात रॅली काढून दारू व तंबाखूमुक्तीचा संदेश दिला.
आम्ही आमच्या गावातील दारू बंद करत आहोत, परंतु शेजारील सायगाव, इरपुंडी, तळेगाव, इरुपढोडरी, सूरसुंडी या गावांची दारू पोलिसांनी बंद करावी, असे आवाहन इरुपटोला, मुरुमाडी, मंगेवाडा गावातील महिलांनी पोलिसांना केले आहे.