शंकर नगरच्या ग्रामसेवकाची महिनाभरापासून कार्यालयाला दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:26 AM2021-05-28T04:26:57+5:302021-05-28T04:26:57+5:30
शंकर नगर हे निर्वासित बंगालीबहुल गाव आहे. येथे स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. येथील ग्रामसेवक शेबे हे पाच वर्षांपासून येथे कार्यरत ...
शंकर नगर हे निर्वासित बंगालीबहुल गाव आहे. येथे स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. येथील ग्रामसेवक शेबे हे पाच वर्षांपासून येथे कार्यरत आहेत; मात्र ते ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहत नाहीत. नवनिर्वाचित ग्रामपंचायत व्यवस्थापनापुढे त्यांची मनमानी सुरूच आहे. येथील सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांना कोणत्याही शासकीय घटनेची माहिती न देता किंवा वैयक्तिक सुट्टीच्या संदर्भात अर्ज किंवा चर्चा न करता ते कार्यालयात गैरहजर राहतात. ग्रामसेवक शेबे गैरहजर राहत असल्याने येथील संगणक परिचालकदेखील गैरहजर राहत आहेत. त्यामुळे गावातील विकास कामांसोबतच सरपंचाच्या आदेशान्वये निघणारे पत्रव्यवहारदेखील बंद पडले आहेत. सोबतच गावकऱ्यांना देण्यात येणारे विविध दाखले ग्रामपंचायत कार्यालयातून मिळणे बंद झाले आहेत. सध्या शंकर नगर येथील ग्रामपंचायत वाऱ्यावर आहे, असा आराेप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात सरपंच देवीदास ढाली, उपसरपंच तपन मल्लिक यांनी संवर्ग विकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून ग्रामसेवक व संगणक परिचालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.