दारू व खर्रा विक्रेत्यांना ग्रामसभेचा अल्टिमेटम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:24 AM2018-11-25T00:24:34+5:302018-11-25T00:25:16+5:30
तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या आदिवासीबहुल जांभळी गावाने दारू व खर्रा विक्री पूर्णपणे बंद करण्यासाठी गुरुवारी २२ नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभा घेतली. या सभेत दारू व खर्रा बंदीचा ठराव सवार्नुमते पारित करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या आदिवासीबहुल जांभळी गावाने दारू व खर्रा विक्री पूर्णपणे बंद करण्यासाठी गुरुवारी २२ नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभा घेतली. या सभेत दारू व खर्रा बंदीचा ठराव सवार्नुमते पारित करण्यात आला. तसेच दारू आणि खर्रा विकताना आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूदही करण्यात आली. गाव संघटन आणि तालुका मुक्तिपथ चमूच्या सहकार्यातून ही ग्रामसभा घेण्यात आली.
जांभळी या गावाला स्मार्ट गाव म्हणून राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. हागणदारी मुक्त गाव या गावाची ओळख आहे. येथील ग्रामसेवक के. के. कुलसंगे यांना राष्ट्रपती पुरस्कारही मिळाला आहे. असे असतानाही गावात दारू व खर्रा विक्री होत असल्याने गावाचे शारीरिक आणि सामाजिक स्वास्थ धोक्यात आले होते. त्यामुळे मुक्तिपथ चमूने दारू व तंबाखू सेवनामुळे होत असलेले दुष्परिणाम लोकांना वारंवार समजावून सांगितले. महिलांना दारूमुळे होत असलेल्या त्रासाची जाणीवही त्यांनी लोकांना करून दिली. त्यामुळे गावातून दारू व खर्रा हद्दपार करण्यासाठी गाव संघटनेच्या सहकायार्तून लोकांनी एकत्र येऊन २२ रोजी विशेष ग्रामसभा घेतली. या सभेत गाव पूर्णपणे दारू व खर्रा मुक्त करण्याचा ठराव घेण्यात आला. दारू व खर्रा बंदीबाबत जनजागृती करण्यासाठी सोमवार २६ नोव्हेंबर रोजी गावातून रॅली काढली जाणार आहे. या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन ग्रामसभेत करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक के.के. कुलसंगे, सरपंच रत्नमाला बावणे, ग्रामसभा अध्यक्ष मधुकर मडावी, हेमंत मडावी, पुरुषोत्तम बावणे, नरेश माथोरे, नाजूक मडावी उपस्थित होते.
विक्रेत्यांवर दंडाचा बडगा
दारू व खर्रा विक्रेत्यांवर यापुढे दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. २५ नोव्हेंबर पर्यंत दारू विक्रेत्यांना त्यांच्याजवळील साठा संपविण्याची सक्त ताकीद ग्रामसभेत देण्यात आली. यानंतर एखाद्याकडे दारू आढळल्यास सुरुवातीला दोन हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. दुसऱ्यांदा आढळल्यास चार हजार रुपये तर तिसऱ्यांदा आढळल्यास थेट पोलीस कारवाईची तरतूद ठरावात नमूद करण्यात आली आहे. त्याचप्रकारे खर्रा विक्रेत्यांनाही १ डिसेंबर पर्यंत त्यांच्याकडील साठा संपविण्याची ताकीद देण्यात आली आहे. त्यांच्यावरही दंड आकारण्याची तरतूद या ठरावात आहे. ठरावाचे पालन न करणाºयांना ग्रामपंचायतीच्या सुविधांपासून वंचित राहावे लागणार असल्याचेही सांगण्यात आले.
महिलांची विशेष ग्रामसभा
गावात विकल्या जाणाऱ्या दारूचा जास्त त्रास हा महिलांना सहन करावा लागतो. अनेकदा दारूमुळे घरी भांडणे होतात. त्यामुळे दारूबंदीसाठी महिलांनी पुढाकार घेण्यासाठी बुधवारी महिलांची विशेष ग्रामसभा घेण्यात आली होती. दारूबंदीची आवश्यकता गावसंघटनेने त्यांना समजावून सांगितली. गावातून दारू हद्दपार करण्यासाठी ग्रामसभेला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे यावेळी महिलांनी सांगितले.