ग्रामसेवकांचे जि.प.समोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 12:29 AM2019-08-14T00:29:24+5:302019-08-14T00:29:45+5:30
ग्रामसेवक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून न्याय मिळवून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने आॅगस्ट क्रांती दिनापासून असहकार व कामबंद आंदोलन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ग्रामसेवक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून न्याय मिळवून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने आॅगस्ट क्रांती दिनापासून असहकार व कामबंद आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी मंगळवारी गडचिरोली येथे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा जि. प. कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपूरकर उपस्थित होते.
याप्रसंगी ग्रामसेवकांनी भर पावसात छत्रीचा आधार घेऊन शासनाच्या अन्यायग्रस्त धोरणाविरोधात निदर्शने केली. यावेळी उमेशचंद्र चिलबुले म्हणाले, संपूर्ण राज्यामध्ये पूर परिस्थिती असताना एकीकडे सामाजिक बांधिलकीतून ग्रामसेवक संपूर्ण कामे युद्ध पातळीवर करीत आहेत. पुणे विभाग वगळता संपूर्ण राज्यात ग्रामसेवकाचे असहकार व कामबंद आंदोलन सुरू आहे. शासनाकडून खासगी कंपन्यांचे लाड पुरविले जाता. परंतु एकही खासगी कंपनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आली नाही, असे चिलबुले यांनी सांगितले.
आंदोलन सभेचे प्रास्ताविक दामोधर पटले, संचालन पांडुरंग पेशने यांनी केले तर आभार खुशाल नेवारे यांनी मानले. सदर जिल्हास्तरीय आंदोलनाला गडचिरोली जिल्ह्यातील १०० वर ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते. भर पावसातही अनेक भागातील ग्रामसेवकांनी हजेरी लावली होती.
१६ ला विभागस्तरावर धरणे आंदोलन
ग्रामसेवक युनियनच्या आंदोलनाचा तिसरा टप्पा १६ आॅगस्टपासून सुरू होणार आहे. १६ आॅगस्टला प्रत्येक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ग्रामसेवक धरणे देणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातून ३५० वर ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी नागपूरच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत.